अमित शहांनी घेतला राहुल गांधींचा खरपूस समाचार


नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी अपयशी ठरलेल्या नेत्यांचे देशात कोणीही ऐकत नसल्यामुळेच अपयशी नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना टोला लगावला. भाषणे देण्यासाठी अयशस्वी नेते अमेरिकेला पळतात. कारण त्यांचे मायदेशात कोणीही ऐकून घेत नसल्याचे म्हणत शहांनी नाव न घेता राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणावर कोलकात्याच्या दौऱ्यावर असलेल्या शहांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

काल (मंगळवारी) अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात राहुल गांधींनी भाषण केले. त्यांनी या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या निर्णयांवरुन मोदींना लक्ष्य केले. हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाने मोदींच्या राजवटीत डोके वर काढले आहे. देशासाठी हे मुद्दे नवे असून, हाच न्यू इंडिया असल्याचे म्हणत मोदींवर राहुल गांधींनी शरसंधान साधले. काँग्रेस आणि भाजपमध्ये राहुल यांच्या या भाषणावरुन सध्या जुंपली आहे.

राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्या टीकेचा भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी खरपूस समाचार घेतला. कामगिरीला सध्याचे सरकार महत्त्व देते. काँग्रेस सरकारसारखी या सरकारची स्थिती नसल्याचे म्हणत शहांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भाजपने कामगिरीच्या जोरावर सरकार चालवण्याची सुरुवात केली आहे. पण अमेरिकेत जाऊन काही नेते भाषणे देतात. कारण त्यांना देशात कोणीही ऐकत नसल्याचे म्हणत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला.