शिवसेना, राष्ट्रवादीचे १२-१६ खासदार सोडणार पक्ष


मुंबई – सध्या राजकीय वर्तुळात काँग्रेसचे नेते नारायण राणे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून त्यातच आता मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे १२ ते १६ खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या नेत्यांशी त्यातील अनेक खासदारांची चर्चा सुरू असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

भाजपने आतापासूनच आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत देशात ३५० हून अधिक खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. भाजपच्या नेत्यांकडून इतर पक्षांच्या खासदारांना भाजपमध्ये आपले स्वागत आहे असे खुले निमंत्रणही दिले जात आहे. राज्यातील भाजप नेते त्या पार्श्वभूमीवर चर्चेतील नेत्यांचे अधून-मधून स्वागत ही करताना दिसत आहेत.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे की, जे नेते पक्ष किंवा नेतृत्वावर नाखूश आहेत. ज्यांना भाजपत प्रवेश करण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागतच आहे. भाजपची दारे त्यांच्यासाठी सदैव खुली आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे असून त्यांच्यात एक बैठकही झाल्याचे वृत्त नुकतेच इंडियन एक्स्प्रेसने दिले होते.