भारतात दाखल झाला सॅमसंगचा बहुप्रतिक्षित गॅलक्सी ८ नोट


नवी दिल्ली : मोबाइल फोन उत्पादनात भारतात अग्रेसर असणाऱ्या सॅमसंगने आपला बहुप्रतिक्षित गॅलेक्सी नोट ८ हा वरिष्ठ श्रेणीतील मोबाइल नवी दिल्लीत मंगळवारी सादर केला आहे. दरम्यान आजच अॅपलचा आयफोन ८ अमेरिकत लाँच होत असतानाच भारतात सॅमसंगने गॅलेक्सी नोट ८ आणून अॅपलसमोर एक मोठे आव्हानच उभे केले आहे. भारतात आयफोन ८ दाखल होण्यास थोडाच कालावधी उरला आहे. त्यातुलनेत सॅमसंग येथील बाजारपेठ दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काबीज करण्याचा तयारीत आहे.

सॅमसंगच्या या बहुप्रतिक्षीत फोनची खास वैशिष्ट्ये म्हणजे नेहमीच्या स्क्रीनपेक्षा मोठा इनफिनिटी डिस्प्ले, एस पेन, मागील बाजूस वाइड अँगलचे दोन मोठे कॅमेरे, ६ जीबी रॅममुळे तगडी कार्यक्षमता आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा आहेत. त्यामुळे या फोनसाठी कंपनीने ‘डू बिगर थिंग्जस’ अशी टॅगलाइन वापरली आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ च्या तुलनेत हा फोन नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा कंपनीला आहे.

या फोनमध्ये ६.३ इंचीचा क्वॉड एचडी, अमोल्ड व इनफिनिटी डिस्प्ले असून १४४०*२९६० पिक्सेलचे रिसोल्यूशन आहे. गॅलेक्सी नोट ५ च्या तुलनेत १८.५:९ रेशोच्या इनफिनिटी डिस्प्लेमुळे १४ टक्के मोठी स्क्रीन मिळणार आहे. १८.५: ९ रेशोच्या स्क्रीनमुळे एकाच वेळी दोन अॅप वापरता येणार आहेत. मोठय़ा स्क्रीनमुळे गॅलरीतील फोटो पाहण्यासाठी सारखे वर-खाली स्क्रोल करण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. मिडनाइट डिस्प्ले आणि आणि मॅपल गोल्ड या दोन रंगामध्ये हा मोबाइल उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment