आनंद महिंद्रा आणि बिग बी यांच्यासह नेटक-यांचा ‘या’ चिमुरड्याला सलाम


मुंबई – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तुम्हालाही जे पाहून कदाचित आपण किती नशिबवान आहोत याची जाणीव होईल. एक अपंग मुलगा दोन हात, दोन पाय नसतानाही कोणाच्या मदतीशिवाय पाय-या चढून जातो ते या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याने घसरगुंडीवर जाण्यासाठी केलेली ही धडपड आणि यशस्वी मोहिम पाहून आपल्याही संघर्षाला बळ मिळते. सोमवारी हा प्रेरणादायी व्हिडीओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तो शेअर केला असून प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.


हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, हा व्हिडीओ पाहण्याची सुरुवातीला हिंमत होत नव्हती. पण नंतर मला प्रेरणा मिळाल्याची जाणीव झाली. यापुढे कितीही कठीण काम असेल तर मी तक्रार करेन असे वाटत नाही.

दरम्यान हा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी देखील रिट्विट केला आहे. खूपच प्रेरणादायी ! सुरुवातीला पाहताना त्रासदायक होते. पण एखादी आई ज्याप्रकारे आपल्या मुलाला प्रोत्साहन देत आहे, ते नक्की पहा, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.