सेवेच्या नावाखाली राम रहीम कमवायचा दरमहा ९२२ कोटी


पानिपत- डेरा सच्चा सौदाला बलात्कारी गुरमीत राम रहीम याने खासगी कमाईचा मार्ग बनवला होता. विना बँक खाते, व्यवहार न करता आणि कोणतीही नोंद न ठेवता राम रहीम दरमहा सुमारे ९२२ कोटी रुपयांची वसुली करत होता. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानातील डेराच्या ९० लाख स्थायी सदस्यांकडून सेवेच्या नावाखाली हा पैसा वसूल केला जात असे. या सदस्यांत २५ हजार पदाधिकारी होते. एका पदाधिकाऱ्याने सांगितले, पदाधिकारी व स्थायी सदस्य होण्यासाठी कमाईचा १० वा हिस्सा बाबाला द्यावा लागत होता. एक लाख रुपये उत्पन्न असलेले पदाधिकारी व १० हजार उत्पन्न असलेले स्थायी सदस्य होण्यास पात्र ठरत. ज्यांना पैसे देणे शक्य नव्हते त्यांना श्रमदान करावे लागत होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५ पदाधिकाऱ्यांसह ६१ सदस्यांची समिती होती. जिल्हाप्रमुख, महामंत्री, कोशाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी पदे होती. याशिवाय दोन पथके होती. एकात ११ तर दुसऱ्या पथकात ४५ सदस्य होते. पथके डेराचा प्रचार व सदस्य नोंदणी करत, तर पदाधिकारी सेवेसाठी दान देत होते. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानातील जिल्ह्यात ३०० हून अधिक “नाम चर्चा घर’ आहेत. येथे दर रविवारी बाबाच्या नावाचा जप होत असे. डेराप्रेमी यादरम्यान १०,२०, ५० रुपये दान करत होते. येथे डेराप्रेमींना जास्तीत जास्त लोक आणण्याबद्दल सांगण्यात येत असे.

डेराप्रेमींना याठिकाणी ऑर्गेनिक फळ आणि भाज्यांची विक्री करण्यात येत असे. गुरमीत शेतात ट्रॅक्टर चालवताना, कुदळ मारताना दाखवण्यात येत असे. यामुळे बाजारात १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या भाज्या येथे ५०० ते १ हजार रुपये नगावर विक्री होत होती.

दरमहा डेरातून पदाधिकारी व स्थायी सदस्यांना एमएसजीची एक किट दिली जात होती. पदाधिकाऱ्यांसाठी ११ हजार व स्थायी सदस्यांसाठी ५१०० रुपये असा दर होता. या लोकांना दरमहा ऐवढी रक्कम द्यावीच लागत होती. याशिवाय बाबांची इतर उत्पादने विक्रीचा दबावही असायचा. ही किट डेरातच पॅकबंद केली जायची. यात डाळी, तांदूळ आणि राईचे तेल इ.खाद्यपदार्थ असत.

डेरामध्ये सोहळ्याच्या वेळी बाबाने वापरलेले कपडे, बूट, खुर्ची आणि त्यांच्या वाहनांचा लिलाव होत असे. आत्महत्या केलेल्या डेराप्रेमी सोमबीरची पत्नी चित्रा यांनी सांगितले, बाबाचा चमकणारा पोशाख सोमबीरने ६ लाखांत विकत घेतला होता. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीम दर सोहळ्यात लिलावातून दहा कोटींची कमाई करत होता.