राहुल गांधी यांचे मार्केटिंग


२०१९सालची लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीच जिंकणार आणि नरेन्द्र मोदी यांच्याशी टक्कर देणारा कोणी नेता सध्या तरी भारतात नसल्याने तेच पुन्हा पंतप्रधान होणार असे देशातले निष्पक्षपाती निरीक्षक कबूल करीत आहेत पण तरीही विरोधकांच्या आशा बुलंद आहेत.
भाजपाचा आणि मोदींचा गवगवा असूनही काही विरोधकांना मोदींची लाट ओसरत आहे असे वाटत आहे. म्हणूनच मोदींना टक्कर देणारा नेता म्हणून राहुल गांधी यांनाच तयार करण्याचा प्रयत्न जारी आहे. गेल्या महिन्यात राहुल गांधी नॉर्वेला जाऊन आले. तिथे त्यांनी काही उद्योगपतींशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सूट बूट परिधान केला होता. आपण एकेकाळी मोदी सरकारची संभावना सूटबूटकी सरकार अशी केली होती याची आठवण राहुल गांधी यांना झाली की नाही हे माहीत नाही पण आता हे कुर्ता पायजमावाले भावी पंतप्रधान अमेरिकेत जाऊन आपले मार्केटिंग करायला लागले आहेत. त्यांनी या निमित्ताने अमेरिकेतल्या बर्कले विद्यापीठात जाऊन भाषण केले पण तिथे जाऊन त्यांनी सध्या मोदी द्वेष्ट्यांनी पिकवलेल्या कंड्यांचाच पुनरुच्चार केला.

या कंड्यात काही तथ्य नाही हे काही सांगण्याची गरज नाही. भारतात व्यक्तीस्वातंत्र्य आहे आणि विचारस्वातंत्र्य आहे म्हणून या अफवा पसरवण्याची या मोदी विरोधकांना परवानगी आहे पण आपण भारताचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत जाणार असू आणि तिथून काही शाबासकी मिळवून जगासमोर आपले नेतृत्व पेश करणार असू तर राहुल गांधी यांना यापेक्षा काही तरी वेगळे आणि चांगले बोलता आले असते. ही एक छान संधी होती. त्यांनी आपल्या मनातले स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरचे देेशाचे चित्र स्पष्ट केले असते तर लोकांना त्यांच्याकडे काही तरी परिपक्वता आहे असे वाटले असते. पण भारतातल्या कोणत्याही निवडणूक प्रचार सभेत करावयाचे भाषणच त्यांना करायचे होते तर त्यासाठी अमेरिकेत कशाला जायला हवे होते. कोणत्याही जाहीर सभेतल्या त्यांच्या भाषणाची ध्वनीफीत तिकडे पाठवून दिली असती तरी चालले असते. सध्याच्या राजकारणात जे खोटारडेपणाचे प्रयोग सुरू आहेत त्यांच्या बाहेर जाण्याची कुवत राहुल गांधी यांच्यात नाही हेच जणू त्यांना अमेरिकेत जाऊन जगाच्या व्यासपीठावरून दाखवून द्यायचे होते. सध्या आपल्या देशात नोटाबंदी, काही विचारवंतांच्या झालेल्या हत्या आणि गोरक्षकांचा हैदोस यावर बराच गोंधळ चालला आहे. हे तर आताचे प्रश्‍न आहेत. पण राहुल गांधी स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर कोणत्या भारताचे चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून आहेत आणि त्या चित्रात ते काय करणार आहेत हे ऐकण्याची लोेकांना उत्सुकता होती.

नरेन्द्र मोदी यांना चार चिमटे काढणे, हिंदुत्ववादी संघटनांना काही लाथा झाडणे याच्या बाहेर राहुल गांधी यांना येता येत नसेेल तर ते देशाला कसले डोंबलाचे नेतृत्व देेणार आहेत ? खरा नेता तोच असतो जो आगामी पन्नास वर्षांचा मार्ग ठरवत असतो. तशी काही कुवत राहुल गांधी यांनी दाखवून द्यायला हवी होती. पण मुळात काहीच नाही तर दाखवणार कोठून ? आपण सतत मोदींवर टीकाच केली तर नकारात्मक प्रतिमा निर्माण होईल म्हणून राहुल गांधी यांनी काही प्रमाणात प्रांजळपणाच्या मनस्थितीत जाण्याचा अभिनय केला. त्यांनी मोदी यांची चांगला वक्ता म्हणून स्तुती केली. पण ती निखालस होऊ नये यासाठी अशा स्तुतीला, ते लोकांचे ऐकत नाहीत अशी पुस्ती जोडली. आपण घराणेशाहीचेच अपत्य आहोत हेही त्यांनी मान्य केले पण ते मान्य करतानाच सार्‍या देशातच घराणेशाही चालली आहे असे शेपूट त्याला जोडले. हा प्रयोग त्यांनी भारतात अनेकदा केला आहे पण घराणेशाही लोकशाहीत बसत नाही असे कबूल करतानाच त्यांनी आपल्याला घराणेशाहीमुळे आयती मिळालेली पदे सोडायला तयार आहोत असे काही म्हटले नाही.

राहुल गांधी यांनी घराणेशाहीचा करिष्मा त्यागून एकदा सामान्य कार्यकर्त्या प्रमाणे काम करून दाखवले पाहिजे तरच त्यांच्या या प्रांजळपणात प्रामाणिकपणाही आहे हे लोकांना दिसेल. अर्थात तशी हिंमत त्यांच्यात नाही. डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार देशात १० वर्षे होते आणि या काळात राहुल गांधी केवळ खासदारच होते असे नाही तर त्याच काळात त्यांच्या नावाचा गवगवा भावी पंतप्रधात म्हणून सुरू होता पण या काळातच त्यांनी एखादे केन्द्रीय मंत्रिपद स्वीकारून आपल्या प्रशासन कौशल्याची चुणूक दाखवायला हवी होती. ते धाडस त्यांना झाले नाही. त्या काळात त्यांनी आपल्या प्रशासन कौशल्याची कथित सव्वा लाखाची मूठ झाकलेलीच ठेवली आणि आता ते अमेरिकेत जाऊन आपण २०१९ सालचे पंतप्रधानपदाचेे उमेदवार आहोत अशी घोषणा करीत आहेत. या घोषणेला काही अर्थ नाही. आताही ते विरोधी पक्षात आहेत पण त्यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपद कधी आपल्याकडे घेतलेले नाही. त्यांची उडी थेट पंतप्रधानपदावर आहे. हीच घराणेशाही धोकादायक आहे. २०१२ साल पासून आपल्या पक्षात उर्मटपणा शिरला आणि त्यामुळे आपला पराभव झाला असेही त्यांनी कबूल केले आहे. पण निदान आता तरी त्यांनी या आरोपातून मोकळे होण्यासाठी काही केले आहे का ? त्यांच्या भाषणाच्या आवाजात अजूनही तो उर्मटपणा आहे. तो कमी करण्यासाठी त्यांना मनातला उद्दामपणा संपवावा लागेल अर्थात तो संपणे अवघड आहे कारण तो घराणेशाहीतून आला आहे.

Leave a Comment