अरे देवा…! एवढ्या स्पीडने बॉलिंग करतो अर्जुन तेंडुलकर


मुंबई – एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकरचा बोलबाला होता. पण आता काळही बदलला आहे आणि वेळही बदलली आहे. सचिन तेंडुलकर संन्यास घेतल्यापासून क्रिकेटच्या मैदानावर पुर्वीसारखा दिसत नाही. पण आता क्रिकेटच्या मैदानावर सध्या एक नवा तेंडुलकर नाव गाजवतो आहे, तो म्हणजे सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. अर्जुन डावखु-या हाताचा जलदगती गोलंदाज आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या एका वेगवान चेंडूमुळे इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेयरस्टो दोन महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये सराव करताना जखमी झाला होता. बेयरस्टो अर्जुनच्या पहिल्याच चेंडूचा सामना करत होता आणि तो यॉर्कर चेंडू होता. अर्जुनने टाकलेला हा यॉर्कर थेट बेयरस्टोच्या अंगठ्यावर जाऊन आदळला आणि बेयरस्टोला नेट प्रॅक्टीस सोडावी लागली. तेव्हापासून अर्जुनच्या गोलंदाजीची चर्चा सुरू झाली. ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा इंग्लंडमध्ये महिला विश्वचषक सुरू होता. त्यावेळी भारतीय महिला संघातील खेळाडूंनी अर्जुनच्या गोलंदाजीवर नेट प्रॅक्टिस केली होती. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या युट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओत १७ वर्षांचा अर्जुन १३० प्रतिताशी किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करताना दिसत आहे.

अर्जुनची गोलंदाजी पाहायची इच्छा असल्याचे काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथ यानेही म्हटले होते. त्याची गोलंदाजी पाहिलेली मी नाही पण मला त्याची गोलंदाजी पाहायची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता. १७व्या वर्षात १३०चा स्पीड त्याचे भविष्य उज्वल असल्याचे दर्शवत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. अर्जुनला त्याच्या मेहनतीचे फळ देखील नुकतेच मिळाले असून त्याची १९ वर्षांखालील मुंबईच्या संघात निवड झाली आहे.