२३० रुपयांचा टोल पडला ८७ हजाराला


पुणे – एकीकडे देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून वारंवार डिजीटल व्यवहार करण्याचे आवाहन करत असतानाच दर्शन पाटील नावाच्या एका व्यक्तीला डिजिटल पेमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे. दर्शन पाटील हे पुण्याला जात असताना त्यांनी टोलनाक्यावर २३० रुपयांचा टोल भरल्यावर काही वेळातच त्यांच्या खात्यातून तब्बल ८७ हजार रुपये काढण्यात आले आहेत. त्यांनी या प्रकरणाची तक्रार पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात केली आहे.

दर्शन पाटील शनिवारी संध्याकाळी त्यांच्या पुण्यातील घरी परतत होते. ते यावेळी खालापूर टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबले. त्यांनी संध्याकाळी ६च्या दरम्यान खालापूर टोलनाक्यावर २३० रुपयांचा टोल भरला. त्यानंतर त्यांना बँकेकडून खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्याच रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बँक खात्यातून २० हजार रुपयांची खरेदी करण्यात आल्याचा मेसेज आला. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मला ६ मेसेजेस आले. माझ्या डेबिट कार्डवरुन बोगस व्यवहार करण्यात आले, असे दर्शन पाटील यांनी सांगितले.

पाटील यांना रात्री ८ च्या दरम्यान बोगस व्यवहाराचा पहिला मेसेज आल्यानंतर ८ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यांच्या खात्यातून ८७ हजार रुपये काढण्यात आले. यानंतर त्यांच्या खात्यातून एकदा १०० रुपयांचा, तर तीन वेळा १० रुपयांचे व्यवहार करण्यात आले. सायबर गुन्हेगारांनी १०० आणि १० रुपयांचे व्यवहार करुन खात्यात एकही रुपया शिल्लक ठेवला नाही, अशी व्यथा पाटील यांनी बोलून दाखवली.