हेल्थ केअर सर्व्हिसेस

सध्या विविध रुग्णालयांमध्ये, उद्योगांमध्ये, विमा कंपन्यांमध्ये, औषधी कंपन्यांमध्ये, वैद्यकीय पर्यटनामध्ये त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांमध्ये सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय कोणता असेल तर तो हेल्थ केअर मॅनेजमेंट असा आहे आणि देशातल्या विविध विद्यापीठांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन हेल्थ केअर सर्व्हिसेस असे अभ्यासक्रम सुरू व्हायला लागले आहेत. वैद्यकीय पदवी प्राप्त केलेल्या पदवीधरांना हे पदवीव्युत्तर अभ्यासक्रम चांगली नोकरी मिळवून देण्यास उपयुक्त ठरू शकतात. तसा विचार केला तर हे अभ्यासक्रम एकप्रकारे व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम आहेत. अनेक वैद्यकीय पदवीधरांना पदवी प्राप्त होईपर्यंत आपण डॉक्टर का होत आहोत हेच कळत नाही. त्यांच्या मनाचा कल वैद्यकीय व्यवसायाकडे नसतो. रोजचे पेशंटस्, औषधाचा वास, सर्जरी नावाची कापाकापी, सततची व्यग्रता, कौटुंबिक सुखाचा अभाव आणि कोणत्याही क्षणी बोलावणे येणे या गोष्टी त्यांना रुचत, पचत, आवडत नाहीत आणि असे लोक वैद्यकीय व्यवसायात मनापासून समर्पित भावनेने कामही करू शकत नाहीत. अशा लोकांसाठी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग होऊ शकणारे हेल्थ केअर मॅनेजमेंटसारखे मॅनेजमेंटचा अधिक भाग असलेले असे वैद्यकीय अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात आणि ते अशा व्यवसायात रमूही शकतात. या अभ्यासक्रमाच्या पदवीधरांची वरील सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये तीव्र गरज जाणवायला लागली आहे आणि त्यामुळे भविष्यकाळात सुद्धा त्यांना चांगली संधी मिळणार आहे. विमा कंपन्यांमध्ये विशेषत: आरोग्य विमा देणार्‍या कंपन्यांमध्ये अशा डॉक्टर कम् व्यवस्थापकांची फार गरज आहे. या कंपन्यांत काम करताना अशा पदवीधरांना प्रत्यक्ष कोणावर उपचार करावा लागत नाही. मात्र विमा धारकांचे आरोग्यविषयक अनेक प्रश्‍न हाताळावे लागतात. निव्वळ व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एम.बी.ए. झालेला पदवीधारक असे प्रश्‍न हाताळू शकत नाही आणि निव्वळ डॉक्टर असलेला पदवीधर सुद्धा असे प्रश्‍न हाताळण्यास असमर्थ असतो. तेव्हा व्यवस्थापन, कायदा आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रामध्ये कुशल असलेला डॉक्टर कम् व्यवस्थापकच तिथे उपयोगी पडत असतो. आय.टी. कंपन्या आजच्या काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या आरोग्याविषयी फारच जागरूक झालेल्या आहेत. आपल्या कंपनी मध्येच व्यायामशाळा सुरू करून कर्मचार्‍यांना फिट राखण्याचा उपक्रम अनेक कंपन्या करायला लागल्या आहेत. अशा कामांसाठी अशा व्यवस्थापकांची गरज आहे. वैद्यकीय आणि प्रशासन अशा दोन्ही गोष्टी हाताळू शकणार्‍या अशा पदवीधरांची वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात सुद्धा खूप गरज आहे. अनेक डॉक्टर एम.बी.बी.एस. झाल्यानंतर एम.बी.ए. होऊन हॉस्पिटल मॅनेजमेंट करायला लागले आहेत. अशा दुहेरी पदवीधरांना केवळ हॉस्पिटलचेच नव्हे तर इतरही अनेक क्षेत्रातले व्यवस्थापनाचे काम मिळू शकते, असे आता दिसून यायला लागले आहे. अनेक कंपन्यांना लिगल ऍडव्हायझर असतात तसे आता हेल्थ ऍडव्हायझरही नेमले जायला लागले आहेत.

Leave a Comment