स्थुलता :प्रकाशाची काळोखी बाजु

fat

जगभरात सध्या सगळीकडेच स्थुलतेचे प्रमाण वाढताना दिसते आहे. यासाठी आहारात प्रक्रिया केलेल्या अन्नाचे वाढते प्रमाण, अधिक कैलरियुक्त आहार, व्यायामाचा अभाव, आधुनिक  तणावग्रस्त जीवनशैली अशा अनेक घटकांना आपण जबाबदार धरतो. लवकरच यात आणखी एका घटकाचा समावेश होण्याची शक्यता दिसते : स्थूलत्व.
प्रकाश आपल्या शरीरातील जैविक घड्याळाचे नियमन करतो. दिवसाच्या प्रकाशामुळे आपली झोप, जेवण्याच्या वेळा आणि चयापचय या सगळ्यांचे नियंत्रण केले जाते. मागे उंदरांवर एक प्रयोग केला गेला होता; प्राण्यांना अधिक गुबगुबीत करण्यासाठी त्यांच्या जीन्समध्ये हस्तक्षेप करण्याचा… मात्र, यामुळे हे उंदीर हृदयविकारासाठी आणि मधुमेहासाठी संवेदनशीलही झाले होते. त्यांच्या सभोवतालच्या प्रकाशाची तीव्रता बदलुनही अशाच प्रकारचे परिणाम मिळतात हे त्यावेळेस ठाऊक नव्हते. हल्लीच हे संशोधन समोर आले आहे.
अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधक लौरा फन्केन यांनी हे संशोधन जगापुढे मांडले. काही तर उंदरांना रात्रीच्या वेळी उजेडात ठेवुन त्यांचे निरीक्षण केले गेले. यामुळे त्यांचे वजन, शरीरातील चरबीचे प्रमाण आणि त्याचबरोबर ग्लूकोजबद्दलची त्यांची असहनशीलताही वाढल्याचे त्यांना आढळले. यामुळेच पुढील काळात ते मधुमेहाला बळी पडण्याचे प्रमाणही वाढते.
हा निष्कर्ष काढण्यासाठी डॉ. लौरा फन्केन यांनी संबंधीत उंदरांचे तीन गट केले. एका गटाला पिंजऱ्यात ठेवुन सतत दिवस-रात्र त्यांच्यावर प्रकाशाचा मारा केला गेला. दुसऱ्या गटाला दिवसातील सोळा तास उजेडात, तर ८ तास अंधारात ठेवले गेले. तिसऱ्या गटालाही १६ तास उजेडात आणि ८ तास काळोखात ठेवण्यात आले; पण यात थोडा फरक होता. त्यांना पूर्ण अंधारात ठेवण्याऐवजी संधीप्रकाशात ठेवले गेले. सलग आठ आठवडे हा प्रयोग पार पाडण्यात आला. पहिल्या आणि तिसऱ्या गटातील उंदरांचे वजन दुसऱ्या गटातील उंदरांपेक्षा जवळपास ५०% अधिक झाल्याचे आढळले. या दुसऱ्या गटातील उंदरांना बहुतांश नैसर्गिक वातावरणात (१६ तास उजेड, ८ तास अंधार) ठेवले गेले होते. या दोन्ही गटातील उंदरांच्या शरीरातील चरबीचे प्रमाणही वाढले होते, आणि ग्लूकोज – सहनशीलता कमी झाली होती. तीनही गटातील उंदरांना सारख्याच प्रमाणात आहार पुरविला होता, आणि त्यांच्या हालचालींचे प्रमाणही समान होते.
केवळ अन्नग्रहण करण्याच्या वेळेनुसारही असा वजनातील फरक जाणवतो का, हे डॉ. फन्केन यांना पहावयाचे होते. त्यादृष्टीने त्यांचे प्रयोगही सुरु होते. यातुन असे पुढे  आले की ज्या उंदरांना दिवसा खाणे भाग पाडले त्यांचे वजन रात्री अन्न खाणाऱ्यांपेक्षा दहा टक्क्यांनी अधिक होते. तसे पाहता दिवसा खाणे हे उंदरासारख्या निशाचर प्राण्यासाठी अनैसर्गिक आहे.
आता या निष्कर्षांचा संबंध मानवाशी कसा लावायचा हा देखील संशोधनाचाच विषय आहे. उंदीर आणि माणुस यांच्यात शारीरिक समानता असल्या तरी त्यांच्यात एक मूलभुत फरकही आहे. उंदीर निशाचर प्राणी आहे, तर माणुस दिनचर… आपण सगळेजण रात्री दिव्यांच्या प्रकाशात जेवतो त्यावेळी दिवसाचा प्रकाश अस्तंगत झालेला असतो. हे म्हणजे उंदरांनी दिवसाच्या वेळेत अन्न खाल्ल्यासारखेच आहे. उशीरा जेवण्याच्या सवयीने वजन वाढू शकते असे मत अनेक आहारतज्ञही व्यक्त करतात. म्हणजेच वजनवाढीच्या संशोधनाला नविन दिशा लाभते आहे…
सौजन्य : द एकौनौमिस्ट

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment