शिमला- हिमाचलची राजधानी

shimla

एकेकाळी ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी आणि हिमाचल या देवभूमीची राजधानी असणारे शिमला निसर्गाच्या मुक्त वरदहस्ताने नटलेले नितांतसुंदर पर्यटन स्थळ आहे. एकदा शिमल्याला गेलात आणि हे शहर तुमच्या रक्तात भिनले की परत परत तेथे जाण्याशिवाय पर्यटकांना दुसरा पर्यायच उरत नाही आणि विशेष म्हणजे दर भेटीत नवीन कांहीतरी तुमच्या नजरेत भरतेच अशी ख्याती असलेले हे टुमदार गांव. पाईन, देवदार, ओक वृक्षांची घनदाट अरण्ये, हिमालयाच्या बर्फाच्छादीत रांगा, राहण्यासाठी एकापेक्षा एक सुंदर हॉटेल्स आणि डोंगर उतारावर असलेली वस्ती यामुळे शिमला हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे.

भारतात १८ व्या शतकांत ब्रिटीश राज असताना हिल स्टेशनची संकल्पना त्यांनी रूजविली त्याची सुरवातच झाली ती शिमलापासून असे सांगतात. ब्रिटीशांनी हिमाचलमध्ये शिमल्याप्रमाणेच डलहौसी, कसौली, पालमपूर, धरमशाला अशा अनेक ठिकाणी वसाहतीच वसवल्या. मात्र त्यातला मेरूमणी म्हणजे शिमला. या गांवाचे मूळचे नांव श्यामला. म्हणजे सावळी स्त्री. हे कालीमातेचेच नांव. छोट्या छोट्या घरांची वस्ती असलेल्या या गावांत युरोपियन लोकांनी  बांधलेले केनेडी हाऊस हीच पहिली मोठी इमारत. अनेक गर्व्हनर,बडे अधिकारी येथे आवर्जून भेट देत असत. १८६४ साली व्हॉईसरॉय जॉन लॉरेन्स याने शिमल्याला उन्हाळी राजधानीचा दर्जा दिला आणि अवतीभवती सात टेकड्या असलेल्या या गावात अनेक सुंदर इमारती, चर्चेस, बौध्द मठ यांची उभारणी झाली. हिंदू मंदिरे पूर्वीपासून होतीच. इंग्लीश होम कौंटीजशी साम्य असलेल्या इथल्या वास्तू पाहायला हव्यातच पण आजही जगातला पूर्ण पादचारी रस्ते असलेला बाजारही चुकवायचा नाही.

राजभवन, ख्राईस्ट चर्च या इमारतींना भेट देतानाच स्कँडल पॉईंटही अनुभवायचा. ब्रिटीश कमांडर इन चीफची मुलगी महाराजा ऑफ पटियाळा यांच्याबरोबर येथूनच पळून गेली अशी या पॉईंटची आख्यायिका. खरे खोटे कोण जाणे पण पोस्ट, बँका, ऑफिसेस असलेल्या या भागात गप्पांचे फड आजही रंगतात असे सांगितले जाते.

शिमल्यातील काली बारी मंदिर १८४५ साली रामचरण ब्रह्मचारी यांनी उभारले आहे. या जुन्या मंदिरापासून जाखू हिल्स हे सर्वात उंच ठिकाण जवळच आहे आणि तेथून सूर्योदय पाहायला खूप गर्दी असते. या हिलवरून शिमल्याचा दिसणारा नजाराही डोळ्यांचे पारणे फेडणारा. दूरवरच्या टेकड्या, डोंगर उतारावरची वस्ती, उंच आणि घनदाट वनसंपदा नजरेला तृप्त करते. कामना देवी मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, तारा देवी मंदिर, बुध्द गोंपा, गुरू द्वारा ही आणखी कांही भेटी द्यायलाच हवीत अशी ठिकाणे. शिमल्यापासून जवळच असलेल्या क्रुफी येथे शक्य असेल तर स्कीईंग, गोल्फ सारख्या खेळांचा आनंद घेता येतो. सतलज नदीत राफ्टींग करण्याची मजाही लुटता येते.

शिमल्याला खरेदीही दणकून करण्याची अनेक कारणे देता येतील. येथील शाली, चांदीचे दागिने, हिमाचलची वैशिष्ठपूर्ण टोपी, कार्पेट, जॅकेटस, लाकडी कोरीव वस्तू, पेंटींग्ज मिळणारा गच्च भरलेला बाजार पाहतानाच चीनी बूट मार्केट, लोअर बजार, लखारा बाजार, तिबेटीयन मार्केट, अशी खरेदीची अनेक ठिकाणे पालथी घालयाची तयारी ठेवायची.

शिमला येथे हिमाचलच्या खास पदार्थांचा आस्वाद घ्यायला हवाच पण भारतीय, कॉन्टीनेन्टल, चीनी जेवणाची सोयही आहेच. अगदी जेवायचे नसले तर चाट, कॅडबरी चॉकलेट व अनेक तर्‍हेचे फास्ट फूड तुमच्यासाठी उपलब्ध आहे. शहरातले म्युझियमही बघण्यासारखे आहे तेथेही भेट द्यायची. शिमल्याला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि रस्तेही चांगले आहेत. विमानाने जाऊ शकता किवा बाय रोड. कल्का शिमला रेल्वेही आहे. कोणत्याही मार्गाने जा, पण शिमल्याला जा असे या शहराच्या बाबतीत सांगावेसे वाटते.

Leave a Comment