माऊंट अबू

abu

रखरखत्या राजस्थानातील हे एकमेव थंड हवेचे ठिकाण. शंख वृक्ष तसेच अनेक जातींच्या फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार अरण्यांच्या टेकड्या भोवताली घेऊन नटलेले हे जणू मरूद्यानच. हिल स्टेशनची जी वैशिष्ठ्ये असतात ती सारी येथे आहेतच पण मुख्य आकर्षण म्हणजे ११ व्या ते १३ व्या शतकांत बांधले गेलेले अप्रतिम दिलवाडा जैन मंदिर. जैनांचे तीर्थक्षेत्र. अबू अनेक ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण आहे. वशिष्ठ ऋषी हे त्यातील एक. राक्षसांपासून पृथ्वीचे रक्षण कण्यासाठी जो यज्ञ केला गेला त्यातून चार अग्निकुल राजपूत वंश निर्माण झाले अशी याची कथा.

या ठिकाणी जाण्यासाठी बसेस, टॅक्सी, रेल्वेसेवा आहे. विमानाने अहमदाबाद पर्यंत जाऊनही येथे जाता येते. मात्र रेल्वे सोयीची. अबू रोडला उतरले की नागमोडी वळणे असलेला, विचित्र आकारांच्या खडकांनी नटलेला घाटरस्ता आपल्याला अबूला घेऊन जातो. मध्यावर असलेले नख्खी सरोवर अतिशय रम्य आहे. येथे नौकाविहाराची मौज लुटता येते.या सरोवराच्या काठाला असलेल्या टेकड्यांवरही अनेक आकाराच्या शिला आहेत. त्यातला बेडूक खडक आगळाच. तलावात उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या बेडकासारखा त्याचा आकार आहे. नंदी खडकही आहे. देवाने आपल्या बोटाच्या नखाने खोदून हे सरोवर तयार केले असे सांगतात. समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवरचे भारतातले हे एकमेव कृत्रिम सरोवर.

दिलवाडा मंदिरे म्हणजे संगमरवरातील अतिशय नाजूक, सुबक कलाकारी, नजरबंदी करणारी. मध्यवर्ती मंदिरात ऋषभदेवाची मूर्ती आहे. आसपासची ५२ मंदिरे असलेला हा मंदिर समूह.प्रत्येक मंदिरात तीर्थंकराची मूर्ती. ४८ कोरीव स्तंभ असलेले प्रवेशद्वार. दरवाजांवरील आच्छादने, स्तंभ, छतावरील अप्रतिम मूर्तीकला म्हणजे कारागिरांच्या कौशल्याचा खास नमुनाच. मंदिर पाहताना गाईडची मदत अवश्य घ्यावी म्हणजे या कोरीव कामामधील तपशील समजणे सोपे जाते.

अबूच्या मुख्य गावापासून थोड्याच अंतरावर असलेली अर्बूजा देवी पाहायलाच हवी. प्रचंड खडकात कोरलेली गुहाच जणू. तीनशे पायर्‍या चढून वर जावे लागते. ही दुर्गादेवीच असून तिला आधार देवी असेही संबोधले जाते. नख्खी सरोवराजवळच असलेले रघुनाथजी मंदिर इसवी सन चौथ्या शतकातले असल्याचे सांगितले जाते. अबूला सर्वत्र हिरवळ, मोठमोठी उद्याने, बागा यांनी आणखी सुंदर बनविले आहे.

अबूपासून जवळच आहे गुरूशिखर. अरवली पर्वताचे सर्वात उंच शिखर. समुद्रसपाटीपासून याची उंची आहे १७२२ मीटर. येथे चढून जाता येते तसेच डोल्याही मिळतात. वर पोहोचल्यावर अबूचे रमणीय दर्शन घडते. या शिखरावर शैवांचे छोटे स्थान आहे तसेच दत्तात्रेयाचे मंदिरही आहे. अनेक साधूसंतांनी येथे तपश्चर्या केल्याने हे स्थान पावन झाले आहे.

माऊंट अबूला उन्हाळ्यात उत्सव असतो. बौद्ध पौर्णिमेपासून सुरू होणार्‍या या उत्सवात सुंदर तळ्याकाठी आदिवासी, लोककलाकार, शास्त्रीय संगीत गायक आपली कला सादर करतात. हिवाळ्यात नववर्षासाठीही येथे खूप गर्दी होते. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम काळ फेब्रुवारी ते जून पर्यंतचा. राहण्या जेवण्याची सोय उत्तम आहे.

Leave a Comment