आता नटराजन लक्ष्य


नरेन्द्र मोदी यांनी भ्रष्टाचारावर बोलताना, किसीको नही छोडुंगा अशी घोषणा केली असून त्याचे प्रत्यंतर येत आहे. भ्रष्टाचाराचा भंडाफोड करताना संबंधितांवर कारवाई होणार हे उघड आहे. पण ज्याच्यावर कारवाई होते तो, आपल्यावर सुडाची कारवाई केली जात असल्याचा कांगावा करतो. ममता बॅनर्जी यांनी सातत्याने असा कांगावा सुरू केला आहे. पी. चिदंबरम हेही असा कांगावा करणारांत आघाडीवर आहेत. आता कॉंग्रेसच्या माजी नेत्या तसेच माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्यावर भ्रष्टाचार निर्मुलन कारवाईची गाज आली आहे. झारखंडातली हत्तींचे अभयारण्य म्हणून राखीव असलेली ५९ हेक्टर वन जमीन त्यांनी बेकायदारित्या अनारक्षित केली असा त्यांच्यावर आरोप आहे.

ही जमीन एक पोलादाच्या उद्योगाला हवी होती. ती अनारक्षित करताना पैशाची देवाणघेवाण झाली असल्याचा आरोप असून या भ्रष्टाचाराबद्दल सीबीआय ने त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांच्या काही मोठ्या शहरात असलेल्या कचेर्‍यांवर धाडीही टाकल्या आहेत. ज्या उद्योगासाठी त्यांनी हा भ्रष्टाचार केला ती कंपनी ओरिसातली असून नटराजन या तामिळ असूनही त्यांचे एक कार्यालय ओरिसातही आहे ही बाब बरीच बोलकी आहे. जयंती नटराजन सध्या कॉंग्रेसमध्ये नाहीत. त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आहे. पक्ष सोडताना त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली तिच्यात त्यांनी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असून जयंती नटराजन यांच्या या प्रकरणाचा राहुल गांधी यांच्याशीही संबंध आहे.

या भ्रष्टाचारावर चर्चा सुरू झाली आणि नटराजन यांनी अशी ही बेकायदा कृती कशी केली असा प्रश्‍न उपस्थित झाला तेव्हा त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे बोट दाखवले. आपण राहुलजींच्या कार्यालयाकडून आलेल्या सूचनांचे केवळ पालन केले आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या संबंधात सोनिया गांधी यांना पत्र लिहून काही खुलासाही केला होता पण सोनिया गांधी यांनी त्यांना उत्तर दिले नाही. उलट त्यांना कॉंग्रेसश्रेष्ठींकडून उपेक्षेची आणि हेटाळणीची वागणूक मिळायला लागली म्हणूनच त्यांनी पक्ष सोडला. आता त्या अडचणीत आल्या आहेत. त्या राहुल गांधी यांच्याकडे बोट दाखवत आहेत पण राहुल गांधी यांनी त्यांना ज्या काही सूचना दिल्या असतील त्या तोंडीच असणार. व्यवसायाने वकील असलेल्या जयंती यांना अशा सूचनांना पुरावा म्हणून शून्य किंमत असते याची माहिती असणारच.

Leave a Comment