सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत आपल्या मनात खुपच आस्था आहे. त्याचबरोबर कोकणातील नैसर्गिक सौदर्य, स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त निसर्ग भावीपिढीसाठी टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्यामुळे येथील निसर्गसौंदर्य जगभरात पोहचविण्यासाठी सहकार्य करेन, अशी ग्वाही प्रसिद्ध सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांनी दिली आहे.
जगभरात पोहचविणार कोकणाचे निसर्गसौंदर्य – जॅकी श्रॉफ
आज शहरातील विविध पर्यटन स्थळांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत जॅकी श्रॉफ यांनी भेट दिल्यानंतर जॅकी श्रॉफ पालकमंत्री केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जॅकी श्रॉफ म्हणाले, आपण गेली अनके वर्ष कोकणात फिरत असून अनेक बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहेत. पालकमंत्री केसरकर यांचे विकासाचे व्हिजन खूप चांगले आहे. येथील शिल्पग्राम प्रकल्प खूप सुंदर असुन मुलांना कलेची आवड निर्माण व्हावी, यासाठी असे प्रकल्प प्रत्येक ठिकाणी उभारावेत, असे कलाकार म्हणून आपणाला वाटते. चित्रीकरणासाठी गोव्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा सुंदर आहे. येथील निसर्गसौंदर्यचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझे नाव वापरून जे काही उपक्रम किंवा कार्यक्रम राबविता येतील त्यासाठी आपले पूर्ण सहकार्य असेल.
श्री. केसरकर म्हणाले, तीन, चार महिन्यापूर्वीच जॅकी श्रॉफ यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. पण शूटिंगमुळे त्यांना येत आले नाही. जॅकी श्रॉफ यांना कलेबरोबरच पर्यटन, निसर्ग आणि वृक्षारोपणाचीही आवड आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध पर्यटन विकास योजनांमध्ये त्यांना रस असल्यामुळे आजच दौरा त्यांचा पहिला किंवा शेवटचा नसून ते पुन्हा जिल्ह्यात येणार आहेत.
रेडी येथील यशवंतगड आणि परिसरातील पर्यटनस्थळाची जॅकी श्रॉफ यांनी केसरकर यांच्यासोबत पाहणी केली. यानंतर त्यांनी सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्रॉफ यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी येथील राजवाडा पहिला.