आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरचे शहर विशाखापट्टनम येथे येत्या 8 ऑक्टोबरपासून सर्व व्यवहार रोकडविरहीत होणार आहेत. त्यामुळे हे देशातील पहिले कॅशलेस शहर ठरणार आहे.
विशाखापट्टनम होणार देशातील पहिले कॅशलेस शहर
विशाखापट्टनम येथे रोकडविरहीत व्यवहार करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी व्हिसा या कार्ड पेमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री नारा लोकेश यांच्याशी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. विशाखापट्टनमला कॅशलेस शहर करण्याच्या पथदर्शी प्रकल्पासाठी व्हिसा कंपनीने राज्य सरकारशी करार केला आहे. जगात हा अशा प्रकारचा पहिलाचा प्रकल्प आहे, असे आंध्रभूमी या वृत्तपत्राने म्हटले आहे.
विशाखापट्टनमला कॅशलेस शहर करण्याची आपली योजना मांडून व्हिसाच्या प्रतिनिधींनी त्यांना या संबंधात उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. या संबंधातील पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे तो येत्या 9 ऑक्टोबरपासून पूर्णपणे सुरू होणार आहे.
सरकार एक योजना आखत असून त्या अंतर्गत कॅशलेस व्यवहारांवर कोणताही अधिभार लावण्यात येणार नाही. हा प्रकल्प देशातील अन्य शहरांसाठी एक प्रेरणा ठरेल, असा विश्वास नारा लोकेश यांनी व्यक्त केला. मात्र व्हिसाच्या प्रतिनिधींनी लोकांना शिक्षित करावे, त्यांच्यावर कॅशलेस व्यवहारांसाठी दबाव आणू नये, असेही लोकेश यांनी सांगितले.