खेळातील धाडस करण्यापूर्वी….


तरुण वय म्हणजे उत्साहाचा सळसळता झरा असतो. या वयात काय करू आणि काय नको असे होते. काही तरी हटके पर्यायाचा विचार केला जातो किंवा धाडसी मार्ग अवलंबिण्याकडे कल असतो. रिव्हर राफ्टिंग, माउंटन क्‍लाइंबिंग, ट्रेकिंग अशा धाडसी खेळांप्रमाणे धबधब्यात भिजतानाही काही तरी ऍडव्हेंचर करावेसे वाटते. ऍडव्हेंचर कितीही थरारक वाटत असले तरी अशा वेळी काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात ऍडव्हेंचर टूरला जायचे तर काय करायला हवे, कोणती पूर्वतयारी करायला हवी, हे जाणून घेणे गरजेचे ठरेल.

* एखादे धाडस करण्यापूर्वी किंवा धाडसी खेळ खेळण्यापूर्वी मानसिक तयारी करणे गरजेचे आहे. मित्रांच्या आग्रहामुळे किंवा कोणी चिडवल्यामुळे हे करत नाही ना, याचा विचार करा. आत्मविश्‍वास असेल तरच पुढे जा. * व्हर्टिगो, ऍक्रोफोबिया, अस्थमा किंवा हृदयविकार असेल, तर भलते धाडस करू नका. धाडसी खेळाची सुरवात करण्याआधी डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. धाडसी खेळ खेळण्यासाठी प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षकांच्या सल्ल्याने पुढे जा. नियम, अटी पाळा. डोंगर चढताना किंवा पाण्यात उतरताना विशेष काळजी घ्यायला हवी.

* रॉक क्‍लाइंबिंग किंवा ट्रेकिंगच्या वेळी अपघात होण्याची शक्‍यता असते. अपघातामुळे गुडघा, मनगट, कोपर यांना दुखापत होण्याची शक्‍यता वाढते. अशा वेळी सुरक्षेसाठी अपेक्षित असलेल्या सगळ्या वस्तू कॅरी करा. हेल्मेट घालायला विसरू नका. गुडघ्यासाठीचे पॅड घेता येईल. कोपर आणि मनगटाचे पॅड वापरता येईल. यामुळे दुखापतीची तीव्रता कमी होईल. * धाडसी खेळ खेळण्याआधी पूर्वतयारी करा. स्नायू आणि सांध्यांच्या हालचाली झटपट होण्यासाठी थोडा व्यायाम करा. आरामदायी कपडे घाला. फाटणारे किंवा सुळसुळीत कपडे घालू नका.

* खेळताना फोटो काढू नका, हे खूपच धोकादायक ठरू शकते. सगळे लक्ष खेळावर किंवा तुम्ही करत असलेल्या ऍक्‍टिव्हिटीवर केंद्रित करा. * धाडसी खेळ खेळायला जाताना सोबत आयडी कार्ड घेऊन जा. * टूर कंपनी किंवा संस्थेसोबत जात असाल तर सगळी चौकशी करा. प्रश्‍न विचारा. सुरक्षेसंदर्भात सर्व प्रकारची काळजी घ्या.