जेईई मेन्स पेपरला जाण्यापूर्वी….


जेईई मेन्स ही उच्च पातळीवरची अभियांत्रिकीची परीक्षा देशातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक परीक्षा मानली जाते. साहजिकच या परीक्षेची काठिण्यपातळी अधिक असते. विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेबाबत खूप तणाव दिसून येतो. वस्तुतः काही गोष्टी लक्षात घेतल्यास हा तणाव कमी होऊ शकतो.

* पेपरचे काळजीपूर्वक वाचन : पेपर हातात पडल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे शांतपणे पूर्ण पेपर वाचून काढावा. पूर्ण पेपर वाचल्यानंतर आपल्याला पेपरमधील कठीण प्रश्‍न कोणते आहेत म्हणजेच पेपरच्या काठिण्याची पातळी लक्षात येईल. पेपरमधील कोणते प्रश्‍न सोपे आहेत याचाही आपल्याला आढावा घेता येईल. त्यामुळे अगोदर सोपे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करावा. यातून वाचलेल्या वेळेत कठीण आणि गोंधळात टाकणाऱ्या प्रश्‍नांना पुरेसा वेळ देता येईल. या नियोजनामुळे चांगले गुण पदरात पडण्याची शक्‍यता वाढते.

* थिरॉटिकल प्रश्‍न आधी सोडवा : गणित आणि भौतिकशास्त्रातील न्यूमॅरिकल भाग हा वेळखाऊ समजला जातो. या प्रश्‍नाचे अचूक उत्तर देण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे सोपे आणि सामान्य प्रश्‍न सोडवल्यानंतर आपण रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील थिरॉटिकल पार्ट सोडवावा. हे प्रश्‍न कमी वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतरच गणित आणि भौतिकशास्त्राचा न्यूमॅरिकल पार्ट सोडवावा.

* पारंगत विषय अगोदर घ्या : एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात किंवा मुद्यात निष्णात, पारंगत असतो. अन्य दोन दोन विषयात तो सरासरीच असतो. अशा स्थितीत आपला जो विषय पक्का आहे. ज्याचे उत्तर आपण पटकन देऊ शकतो, तो विषय किंवा मुद्दा अगोदर सोडवावा. संबंधित प्रश्‍नांची उत्तरे आल्याने आपला आत्मविश्‍वास अधिक वाढतो. त्यातही आपण अगोदर थिरॉटिकल प्रश्‍न पहिल्यांदा सोडवावेत जेणेकरून न्यूमॅरिकल प्रश्‍न सोडवण्यासाठी आपल्याकडे वेळ राहील.

* विषयानुसार ऍप्रोच : प्रत्येक विषयात विविध युनिट आणि चॅप्टर्स असतात. रसायनशास्त्रात तीन भाग असतात. इनॉर्गिनिक, ऑर्गेनिक आणि फिजिकल केमिस्ट्री. इनऑर्गेर्गिक केमिस्ट्रीत बहुतांश चॅप्टरला कोणतेही लॉजिक नसते आणि त्याची आपल्याला घोकंपट्टी करावी लागते. त्यामुळेच आपण परीक्षेत इनऑर्गेनिक केमिस्ट्रीचे प्रश्‍न अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतरच ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा विचार करावा. याठिकाणी आपल्याला रिऍक्‍शन मॅकॅनिजमच्या कंसेप्टचा विचार करून रिऍक्‍शन आठवावे लागतात. शेवटी फिजिकल केमिस्ट्रीचे प्रश्‍न सोडवा, जे वेळखाऊ असतात. याचप्रकारे आपण गणित आणि भौतिकशास्त्रासाठी रणनीती आखू शकता.

* स्मार्ट टाइम मॅनेजमेंट : पेपर सोडविण्यासाठी रणनीती आखू शकता. मात्र सर्वांत महत्त्वाचे आहे ते टाइम मॅनेजमेंट. प्रश्‍न सोडवताना घड्याळावर सारखे लक्ष ठेवा. जर एखादा प्रश्‍न आपला अधिक वेळ घेत आहे, असे जर वाटत असेल तर तो प्रश्‍न सोडून तुम्हाला पुढे जावे लागेल. वेळ वाचविण्यासाठी शक्‍य तेवढे लवकरात लवकर अचूक प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करावेत. शेवटी जो प्रश्‍न अर्धवट ठेवला आहे, तो पुन्हा पाहण्यास विसरू नका. वेळेचे अचूक नियोजन करणारा व्यक्तीच सर्वांत बुद्धिमान मानला जातो. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटला दुय्यम स्थान देऊ नका. त्याचबरोबर जेईई मेनमध्ये प्रश्‍नाचे उत्तर चुकल्यास एक चतुर्थांश गुण कापले जातात. त्यामुळे वेगाने उत्तर देण्याच्या नादात अचूकतेकडे दुर्लक्ष करू नका.

Leave a Comment