जाहिरातीच्या नादात; पतंजलीच वादात !


नवी दिल्ली: योगाच्या प्रसारातून गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत शिरकाव करून साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या रामदेव बाबा यांच्या पतंजलीला आता झटका बसला आहे. योगाच्या जोरावर भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या नादात प्रतिस्पर्ध्यांना गारद करण्यासाठी तयार आणि प्रसारित केलेल्या जाहिरातीच बाबा रामदेव यांच्या पतंजलीला अडचणीत आणण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.

रामदेव बाबांच्या पतंजलीला मुंबई उच्च न्यायालयाने आता धक्का दिला आहे. हिंदुस्तान युनीलिव्हरचे साबण निकृष्ट दर्जाचे असतात, असा रोख असणाऱ्या पतंजलीच्या जाहिरातीला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशांशिवाय पतंजलीला ही जाहिरात दाखवता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे.

पतंजलीकडून या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पतंजलीने त्यांच्या जाहिरातीत लक्स, पीअर्स, लाईफबॉय आणि डव या युनीलिव्हरच्या उत्पादनांना लक्ष्य केले आहे. ग्राहकांनी केमिकलपासून तयार करण्यात आलेल्या साबणांचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक वस्तूंपासून निर्माण करण्यात आलेले साबण वापरावेत, असे पतंजलीने अप्रत्यक्षपणे या जाहिरातीमधून म्हटल्याचे वृत्त इंग्रजी दैनिकाने दिले आहे. या प्रकरणात हिंदुस्तान युनीलिव्हरने ४ सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जाहिरातीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे देशात बाथ सोपची बाजारपेठ १५ हजार कोटी रुपयांची आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक बाजारपेठ हिंदुस्तान युनीलिव्हरच्या ताब्यात आहे.

यापूर्वीही अवास्तव जाहिराती केल्याबद्दल ‘पतंजली’ला जाहिरातीचे नियमन करणाऱ्या नियामक संस्थेने फटकारले होते. मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपण स्पर्धा निर्माण केल्यामुळे त्यांच्याकडून आपल्या विरोधात कारस्थान केले जात असल्याचा दावा रामदेव बाबांनी केला होता. अर्थात ‘पतंजली’ने बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी असलेल्या बाजारपेठेचा मोठा वाटा आपल्याकडे वाळविल्याची वस्तुस्थिती असून आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याची दाखल घेतली आहे हे उल्लेखनीय !

Leave a Comment