चीनमधील ओसाडवाडी


चीनच्या ओडास वाळवंटाजवळ उभारले गेलेले न्यू ओडास शहर जगातील सर्वात मोठे ओसाड शहर किंवा घोस्ट सिटी म्हणून प्रसिद्धीस आले आहे. १० लाख लोक राहू शकतील या हिशेाबाने वसविल्या गेलेल्या या शहरात आज जेमतेम २० हजार लोक राहात आहेत. या शहराला कांगबाशी असेही दुसरे नांव आहे.

या शहरातील रस्ते रिकामे, इमारती ओसाड व त्याही तुटक्या फुटक्या अवस्थेत असे दृष्य दिसते. चीनच्या इनर मंगोलिया क्षेत्रात हे शहर वसविले गेले होते. क्रूरकर्मा चंगेजखान याचा जन्म याच प्रांतातला. या भागातील लोकवस्तीत १७ टक्के मंगोल वंशाचे लोक आहेत तर बाकीचे मूळचे चीनी आहेत.५ वर्षांपूर्वी चीन सरकारने या शहराच्या बांधणीसाठी १ अब्ज डॉलर दिले होते. मोठमोठ्या सुंदर इमारती, रस्ते, बगीचे यांचे बांधकाम त्यातून हाती घेण्यात आले मात्र अनेक कामे वेळेत पूर्णच झाली नाहीत. परिणामी घेतलेले कर्ज फेडले गेले नाही व गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने अनेक कामे अर्धवट राहिली.

या शहरातील जागांचे दर तेव्हा इतके प्रचंड होते की लोकांना इच्छा असूनही येथे मालमत्ता खरेदी करणे अवघड बनले. त्यामुळे अनेक घरे, दुकाने विकलीच गेली नाहीत. गेल्या पाच वर्षात या शहरातील वास्तूंच्या किमती पाच पटीने स्वस्त झाल्या आहेत मात्र अजूनही ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सध्या तरी हे शहर ओसाडवाडी बनले आहे.

Leave a Comment