या मंदिरात भाविकांच्या डोक्यावरच फोडला जातो नारळ


तमीळनाडूतील कृष्णरायपुरम येथील महालक्ष्मी अम्मन मंदिरात अतिशय भक्तीभावाने देशभरातील विविध भागातून भाविक येत असतात. या भाविकांची श्रद्धा किती अगाध आहे याचे दर्शन या देवळात गेल्यावर होते. येथे पुजारी भक्तांच्या डोक्यावरच नारळ फोडतात. ब्रिटीश काळापासून ही परंपरा सुरू असून भाविकांत पुरूषांप्रमाणेच महिलाही डोक्यावर नारळ फोडून घेतात. यामुळे आरोग्य चांगले राहते व भगवानाची कृपा होते असा भाविकांचा दृढ विश्वास आहे.

यामागे अशी कथा सांगितली जाते की ब्रिटीश काळात येथून रेल्वे लाईन न्यायची होती पण गावकर्‍यांचा त्याला विरोध होता. त्यावेळी खड्डा खणताना नारळाच्या आकाराचा एक दगड ब्रिटीशांना आढळला. त्यांनी गावकर्‍यांना आव्हान दिले की या दगडावर डोके आपटून जर हा दगड फोडला तर रेल्वेचा मार्ग बदलला जाईल. गावकर्‍यांनी हे आव्हान स्वीकारले व खरोखरच डोक्याचे आघात करून दगड फोडला.त्यासाठी जे लोक तयार झाले होते त्यांच्या स्मरणार्थ आजही येथे ही परंपरा पाळली जाते.

डोक्यावर नारळ फोडून घेणे ही येथे आम बात असून यात अनेकजण जखमी होतात मात्र त्याची फिकिर केली जात नाही. डोक्यातून रक्त आले तर हळदीचा लेप लावला जातो. कांही वेळा भक्तांना नारळामुळे झालेल्या धोकादायक जखमेमुळ रूग्णालयात दाखल करण्याचीही पाळी येते तर काही वेळा येथे डॉक्टरांचे पथक हजर असते. जखमा झाल्या तरी भक्तांच्याच्या श्रद्धेत कांहीही फरक पडत नाही.

Leave a Comment