शिक्षक दिनानिमित्त डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काही - Majha Paper

शिक्षक दिनानिमित्त डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काही

१९६२ साली ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवसशिक्षक दिनम्हणून सर्वप्रथम साजरा केला गेला. डॉक्टर राधाकृष्णन भारताचे माजी राष्ट्रपती होते. तत्पूर्वी ते उपराष्ट्रपती होते. रशियामध्ये भारताचे राजकीय दूत म्हणून अतिशय महत्वाची राजकीय जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया या डॉक्टर राधाकृष्णन यांच्याविषयी.

 सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी एका निर्धन ब्राह्मण घरामध्ये, तमिळनाडूच्या तीरुत्तानी येथे झाला. त्याकाळी तीरुत्तानी तत्कालीन मद्रास संस्थानामध्ये होते. राधाकृष्णन यांनी मोठे होऊन पांडित्य करावे अशी त्यांचा वडिलांची इच्छा होती. पण कालांतराने राधाकृष्णन ना तिरुपती मध्ये असलेल्या शाळेत पाठविण्यात आले. राधाकृष्णन सुरुवातीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार असल्याने त्यांनी शिक्षणामध्ये अतिशय वेगाने प्रगती केली. शिक्षणाकरिता त्यांना अनेक शिष्यावृत्तीही मिळाल्या. राधाकृष्णन यांनी वेल्लूर येथील वूर्ही कॉलेजमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही काळाने त्यांनी मद्रास क्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तिथे तत्वज्ञान हा विषय शिकण्यास सुरुवात केली. पण हा विषय त्यांना नाईलाजाने निवडावा लागला कारण इतर विषयांची पुस्तके विकत घेण्याइतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते. त्याकाळी त्यांचा एक नातेवाईक त्याच कॉलेजमधून तत्वज्ञान हा विषय घेऊन पदवीधर झाला होता. त्याच्याकडून ती पुस्तके मागून घेऊन राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान हा विषय शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी लिहिलेला वेदांत तत्वज्ञानावरील प्रबंध सर्वोत्तम म्हणून घोषित केला गेला.

राधाकृष्णन यांनी १९०८ साली तत्वज्ञानामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडन्सी कॉलेज येथे तत्वज्ञान हा विषय शिकविण्यास सुरुवात केली. काही कालानंतर राधाकृष्णन कलकत्ता विद्यापीठामध्ये रुजू झाले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठ, मैसूर विद्यापीठ येथेही त्यांनी काही काळ घालविला. डॉ राधाकृष्णन आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठांचे कुलगुरूही होते.

तत्वज्ञान शिकविण्यामध्ये हातखंडा असल्याने राधाकृष्णन त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. पाशिमात्य देशांमध्ये तत्वज्ञान या विषयाचे शिक्षण घेण्याच्या संकल्पनेचे जनक राधाकृष्णन हेच आहेत. राधाकृष्णन यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी सिवकामू यांच्याशी झाला. १९५८ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

१९५२ साली उपराष्ट्रपतीपदावर येण्यापूर्वी डॉक्टर राधाकृष्णन यांची युनेस्को चे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ते सोव्हियेत संघामध्ये भारतिय राजदूत म्हणून कार्यरत होते. १९६२ साली डॉक्टर राधाकृष्णन यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. त्यानंतर त्यांचा जन्मदिवसशिक्षक  दिनम्हणून साजरा करण्याची इच्छा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आपला जन्मदिवस सर्व शिक्षकांच्या सन्मानाप्रीत्यर्थ साजरा करण्यात येणार असल्याची कल्पना डॉक्टर राधाकृष्णन यांना आवडली, आणि त्यांनी या कल्पनेस मान्यता दिली. तेव्हापासूनच ५ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

राधाकृष्णन यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकीर्दीमध्ये भारताने दोन युद्धांचा सामना केला. १९६२ साली चायना आणि १९६५ साली पाकिस्तान विरुद्ध ही युद्धे होती. राधाकृष्णन यांच्या आयुष्याची अखेरची वर्षे अतिशय एकाकीपणाची होती.

Leave a Comment