गांधीनगर: भारतात मोठ्या प्रमाणावर सूर्यप्रकाश वर्षभर उपलब्ध असतानाही हवेच्या प्रदूषणामुळे भारतातील ऊर्जा उत्पादनाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे भारताच्या अपेक्षित सौरऊर्जा क्षमतेपेक्षा २५ टक्के उत्पादन करणेही मुश्कील झाले आहे; असे भारत आणि अमेरिकेतील संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.
वायूप्रदूषणामुळे भारताच्या सौरऊर्जा उत्पादनाला फटका
भारतात वर्षभर दिवसातील पुरेसा काळ प्रखर उपलब्ध आहे. त्यामुळे भारताकडे सौर ऊर्जा उत्पादनाची मोठी क्षमता आहे. भारतात ऊर्जेची मागणीही मोठ्या प्रमाणात असून पारंपरिक जलविद्युत आणि कोळशावर आधारीत विद्युत निर्मिती प्रकल्प ही गरज पूर्ण करू शकत नाहीत. तसेच ही वीज महागही आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून भारतात कोट्यवधींचा निशी खर्च करून ठिकठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सौर ऊर्जा उत्पादनातही महासत्ता होण्याची भारताची महत्वाकांक्षा आहे.
मात्र देशातील वाढत्या वायूप्रदूषणामुळे हवेतील धूळ आणि धुके याचे प्रमाणही वाढत आहे. धूळ आणि धुक्याद्वारे सूक्ष्म कण सौर ऊर्जा उत्पादनांसाठी उभारलेल्या सोलर पॅनलवर साठतात. त्यामुळे सूर्यप्रकाश शोषून घेण्याची त्याची क्षमता घटते. त्यामुळे या प्रकल्पांमधून अपेक्षित ऊर्जा उत्पादन होऊ शकत नाही; असे या संशोधन पत्राचे सहलेखक प्रा. चिन्मय गोरोई यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. भारतातील उन्हाच्या उपलब्धतेमुळे पूर्वी देशात सौर ऊर्जा उत्पादनाची जेवढी क्षमता अपेक्षित धरण्यात आली होतो; प्रत्यक्षात त्यापेक्षा २५ टक्क्यांनी कमी ऊर्जा उत्पादन होत असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. वायू प्रदूषणामुळे सौरऊर्जा उत्पादनात तब्बल ३ हजार ९०० मेगावॅट तूट येत असून ती २५ लाख पॅनेलच्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेपेक्षा ६ पट अधिक आहे. या आकडेवारीवरून मानवनिर्मित प्रदूषणामुळे सौरऊर्जा उत्पादनामध्ये देशाला किती मोठा फटका बसत आहे; ते दिसून येईल; असे प्रा गोरोई यांनी निदर्शनास आणून दिले.