भारतवर्षातील पाच महान गुरू


पाच सप्टेंबर हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला दिव्य गुरूंची परंपरा मोठी आहे व आजही त्यांची शिकवण अनेक क्षेत्रात उपयोगी पडत असल्याचा अनुभव घेता येत आहे. भारतातील पाच महान गुरूंची ओळख या निमित्ताने आपण करून घेत आहोत.

सांदिपनी- सांदिपनी ऋषी हे श्रीकृष्णाचे गुरू. त्यांचा आश्रम उज्जैन येथे होता. येथेच श्रीकृष्णाने ६४ कलांचे शिक्षण घेतले. श्रीकृष्ण विष्णुचाच अवतार असल्याने सर्वज्ञानी होता तरीही त्याने गुरूंकडून शिक्षण घेतले. यातून श्रीकृष्णाने हे सिद्ध केले की माणूस कितीही प्रतिभाशाली, हुषार व ज्ञानी असला तरी त्याला चांगला गुरू असणे आवश्यक असते. श्रीकृष्णाने अवघ्या ६४ दिवसांत ६४ कला आत्मसात केल्या होत्या. गुरू सांदिपनी नुसते शिक्षक नव्हते तर ते महान तपस्वीही होते.


वशिष्ठ- हे त्रेतायुगातील श्रीरामाचे गुरू.ते अतिशय ज्ञानी होते व बालवयातच रामाची प्रतिभा व सद्व्यवहार त्यांनी जोखले होते. भविष्यात हा मुलगा सूर्यवंशी राम म्हणून ओळखला जाणार असे त्यांनी अगोदरच जाहीर केले होत. त्यांनी श्रीरामाला वेद वेदागांचे ज्ञान दिले होते.

विश्वामित्र- श्रीराम उत्तम योद्धा बनला तो विश्वामित्रांनी दिलेल्या शिक्षणामुळे. विश्वामित्र हे क्षत्रिय राजा होते मात्र नंतर ते ऋषी बनले. भृगू ऋषींचे ते वंशज. विश्वामित्रांना त्यांच्या काळातले सर्वात महान शस्त्र संशोधक मानले जाते. श्रीरामाला जी दिव्यास्त्रे दिली ती सर्व विश्वामित्रांनीच दिली होती. इतकेच नव्हे तर त्यांनीही ब्रह्माप्रमाणे प्रतिसृष्टी तयार केली होती.


द्रोणाचार्य – द्वापारयुगात हे कौरव व पांडवांचे गुरू होते. त्यानी त्यांचा आवडता शिप्य अर्जुन याला युद्धकलेचे विशेष शिक्षण देऊन त्याला महान योद्धा बनविले होते. याचाच परिणाम म्हणून अर्जुनाच्या पराक्रमामुळे पांडव महाभारतातले भीषण युद्ध जिंकू शकले.

चाणक्य – विष्णुगुप्ता नावाचा हा गुरू कलियुगातील पहिला युगनायक म्हणून ओळखला जातो. चंद्रगुप्त मौर्याला कुटनितीचे व युद्धाचे उत्तम प्रशिक्षण देऊन त्यांनी अखंड भारताचा सम्राट बनविले होते. त्यावेळी भारत छोट्या छोट्या राज्यात विभागला गेला होता ही सर्व राज्ये एकत्र करून त्यांनी अखंड भारत बनविण्याची महान कामगिरी पार पाडली. ते खरे अर्थशास्त्रज्ञ. मात्र राजकारणाचीही त्यांना प्रचंड समज होती. त्यामुळे महान रणनितीकार म्हणून त्यांची आजही ओळख आहे इतकेच नव्हे तर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून आजही अनेकांना मार्गदर्शन मिळते. चाणक्य निती म्हणून प्रसिद्ध असलेली ही निती चतुर राजकारण व अर्थकारण यांची जणू गंगाच आहे.