‘छम्मक छल्लो ‘ म्हणणे आता कायद्याने गुन्हा


कुठल्या ही स्त्रीला उद्देशून ‘ छम्मक छ्लो ‘ असे म्हणणे, हा त्या स्त्रीचा विनयभंग समजून, तसा उल्लेख एखाद्या स्त्रीच्या बाबतीत केल्यास तो कायदेशीर गुन्हा समजण्यात येईल, असे ठाणे, मुंबई येथील न्यायालयाने म्हटले आहे. ‘ छम्मक छल्लो ‘ हा शब्द सर्वसाधारणपणे कुठल्याही स्त्रीच्या प्रशंसेसाठी उच्चारण्यात येत नसून, उलट त्यामागे त्या स्त्रीचा अपमान करण्याचीच भावना असते, असे ही न्यायालयाने पुढे म्हटले आहे.

‘छम्मक छल्लो ‘ हा शब्द बॉलीवूड मधील एखाद्या चित्रपटाच्या गाण्यात ऐकायला जरी चांगले वाटत असले तरी वस्तुस्थिती मध्ये मात्र हे शब्द एखाद्या स्त्रीला उद्देशून म्हटले गेले, तर ते शब्द उच्चारणारी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते. हे शब्द उच्चारणाऱ्या ठाणे येथील एका व्यक्तीला येथील न्यायालयाने, न्यायालयाची वेळ संपेपर्यंत साधी कैद आणि एक रुपया दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे २००९ साली ही महिला आपल्या पतीसमवेत सकाळी फिरून परत येत असताना जिन्यामध्ये ठेवलेल्या आरोपीच्या कचराकुंडीला तिचा धक्का लागला. त्यावेळी आरोपीने चिडून जाऊन तिला कचराकुंडीला धक्का लावण्याबाबत सुनवून, पुढे तिला उद्देशून ‘छम्मक छल्लो’ असे ही म्हटले. हा अपमान सहन न होऊन महिलेने आधी पोलिसात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने त्या महिलेने मदतीसाठी न्यायालयाकडे धाव घेतली.

न्यायालायामध्ये या खटल्याची सुनावणी होण्यास तब्बल आठ वर्षे लागली असली तरी अखेरीस तक्रार करणाऱ्या महिलेस न्याय मिळाला. तिची तक्रार ग्राह्य मानून न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल देत आरोपीला ५०९ कलमान्वये शिक्षा सुनावली. आरोपीने उच्चारलेले हे शब्द त्या महिलेच्या प्रशंसेदाखल उच्चारले नसून, त्या महिलेचा अपमान करण्याचा हेतू त्यामागे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हे शब्द ऐकून कुठल्याही महिलेला चीड येणे स्वाभाविक आहे असे ही न्यायालयाने नमूद केले आहे.

Leave a Comment