अन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठी हे सोपे उपाय करा


भाज्या किंवा फळे बाजारातून आणली की काही वेळातच त्यांची रया जाऊन ती शिळी दिसायला लागतात विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात तर फळे आणि भाज्या तजेलदार दिसतच नाहीत. त्यामुळे भाज्या आणि फळे टिकवून कशी ठेवता येतील हा एक मोठाच प्रश्न असतो. यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करता येईल. फ्रीजमध्ये भाज्या किंवा फळे क्रीस्पर ( खास भाज्या किंवा फळे ठेवण्यासाठी फ्रीज मध्ये दिला गेलेला कप्पा ) मध्ये ठेवण्यापूर्वी त्यामध्ये आधी काही टिशू पेपर किंवा एखादा पातळ मलमलचा कपडा घालून मग त्यामध्ये भाज्या किंवा फळे साठवावीत. टिशू पेपर किंवा मलमलच्या कपड्यामुळे क्रीस्पर मधील आर्द्रता शोषली जाऊन भाज्या आणि फळे कोरडी राहतात. जर क्रीस्पर मध्ये ओलसरपणा राहिला तर भाज्या किंवा फळे लवकर खराब होण्याची शक्यता असते.

बाजारातून केळी आणल्यानंतर ती देठापासून वेगळी वेगळी तोडून ठेऊ नये. केळी देठावरच राहू देऊन, देठाभोवती प्लास्टिक रॅप किंवा क्लिंग फिल्म गुंडाळावी. त्यामुळे केळी लवकर काळी पडायला न लागता अधिक काळ ताजी राहतील. पावसाळ्यामध्ये घरात आणून ठेवलेल्या बटाट्यांना कोंब फुटायला लागतात. बटाट्यांना कोंब फुटू नयेत म्हणून एखादे सफरचंद बटाट्यांच्या टोपलीत घालून ठेवावे. सफरचंदामुळे इथायलीन हा वायू तयार होतो. ह्या वायुमुळे बटाटे मऊ न पडता अधिक काळ ताजे रहातात.

सफरचंदामुळे तयार होणारा इथायलीन हा वायू बटाट्यांकरिता जरी चांगला असला तरी बाकी फळे आणि भाज्या यांना तो हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे इतर फळांच्या किंवा भाज्यांच्या जोडीला सफरचंदे न ठेवता, ती एका प्लास्टिक बॅग मध्ये बांधून फ्रीजमध्ये वेगळी ठेवावीत. स्ट्रॉबेरी सारखी महाग फळे साठवताना विशेष काळजी घ्यावी. एकतर ही फळे खूप महाग असतात आणि दुसरे म्हणजे ही फळे व्यवस्थित साठवली न गेल्यास लगेचच खराब होतात. स्ट्रॉबेरी जास्त काळ टिकविण्यासाठी एक कप व्हिनेगर मध्ये तीन कप पाणी घालावे आणि या मिश्रणामध्ये स्ट्रॉबेरी धुवून घ्याव्यात. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन स्ट्रॉबेरी पूर्णपणे कोरड्या करून घ्याव्या आणि मगच फ्रीज मध्ये ठेवाव्यात.

टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवावेत. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटो चा स्वाद आणि रसाळपणा कमी होतो. त्यामुळे बाजारातून टोमॅटो विकत घेताना थोडे पिकलेले आणि थोडे कच्चे घ्यावेत, आणि एखाद्या टोपलीत साठवावेत. पिकलेले टोमॅटो वापरून होईपर्यंत कच्चे टोमॅटो पिकून वापरण्यासाठी तयार होतात. कांदे आणि बटाटेही फ्रीजमध्ये ठेऊ नयेत, तर ते ही एखाद्या टोपलीमध्ये साठवून, ऊन लागणार नाही अश्या ठिकाणी ठेवावेत.

मशरूम्स जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी प्लास्टिक च्या पिशवीत न ठेवता एखाद्या कागदी पिशवीत ठेवावीत. आर्द्रता किंवा ओलसरपणामुळे मशरूम्स लवकर खराब होऊ लागतात. कागदी पिशवीत मशरूम्स ठेवल्यामुळे त्यातील आर्द्रता शोषली जाऊन ती जास्त काळ टिकून राहतात. तसेच बेदाणे. मनुका, किशमिश , अक्रोड , बदाम इत्यादी सुका मेवा एअरटाईट डब्यांमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा.