कला हेच माझे जीवन: मुरली लाहोटी


वातानुकूलित कक्षात बसून उन्हाळ्याचे चित्र खरोखर उतरत नाही. त्यासाठी अनवाणी हिंडून उन्हाच्या झळा अंगावर घ्याव्या लागतात; हे उद्गार आहेत विख्यात चित्रकार मुरली लाहोटी यांचे ! कलाकाराला स्वानुभव हवा. चौफेर जीवनानुभव हवा. मगच त्याचे चित्रातले रंग, रेषा आणि पोत बोलू लागतात. जेव्हा चित्र कलाकाराच्या काळजातून कॅनव्हासवर प्रतीत होते; तेव्हाच हे घडू शकते; हे मनोगत चित्रकला आणि शिल्पकलेतील या भीष्माचार्यांनी ‘माझा पेपर’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केले.

आपले सारे आयुष्य चित्रकलेसाठी अर्पण करायचे. कुटुंबात चालत आलेल्या सुस्थापित व्यापारात अडकून रूढार्थाने प्रस्थापित आणि सधन आयुष्य जगायचे नाही; याची खूणगाठ त्यांनी शाळकरी वयातच मनाशी बांधली होती. या वेडातून त्यांनी परळी येथील घर दहावीची परीक्षा दिल्यानंतर सोडले. खिशात केवळ अकरा रुपये ! कलाशिक्षणाची सुविधा पुण्यात असल्याची माहिती घेऊन ते निश्चयाने पुण्यात आले. आज हाच माणूस जगप्रसिद्ध चित्रकार आहे.

हॉंगकॉंगपासून पॅरिसपर्यंत त्यांनी प्रवास केला. एअर इंडियापासून रिलायन्सपर्यंत देशात व परदेशात अनेक कलारसिकांकडे त्यांची पेंटिंग्स, म्युरल्स अभिमानाने विराजमान आहेत. लाहोटी यांच्या कलेची तब्बल १५७ प्रदर्शने देशात व परदेशात झाली आहेत. आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची सन्मान्य ‘डी लिट’ही त्यांना नुकतीच प्रदान करण्यात आली. असा हा ध्येयवेडा कलावंत ! त्यांचे वास्तव्य, कर्मभूमी आहे पुणे!

सन १९७८ मध्ये लाहोटी पुण्यात आले. शिकायचे कसे; रहायचे कुठे; उदरनिर्वाह कसा चालवायचा; असे सगळेच प्रश्न ! तेव्हा डेक्कन भागात हिन्दविजय सिनेमाघर होते. तिथे काही दिवस चहाच्या दुकानात नोकरी, मग स्वतःची भेळेची गाडी; असे करत त्यांनी अभिनव कला महाविद्यालयात ‘जीडी आर्ट , पेंटिंग’ला प्रवेश घेतला. पहिला काही काळ भेळेची गाडी व शिक्षण. भेळेच्या गाडीतून मिळणाऱ्या उत्पन्नात रंग सामानाची खरेदी व कलासाधना हे सगळेच सुरु होते. मग पुढे पेंटिंगची कामे सुरु केली. नंतर कमर्शिअल आर्टचा डिप्लोमाही केला. पण त्यांचे मन रमले पेंटिंगमध्येच ! दिल्ली, मुंबईत चित्र प्रदर्शने पाहून त्यांनी ठरवले आपण प्रदर्शने करायची. विद्यार्थीदशेतच त्यांनी प्रदर्शने केली. विद्यार्थी दशेतच तब्बल ८ सुवर्ण पदके, राज्य पुरस्कार मिळवले. पुढे टाईम्स,धर्मयुग, विकलीमध्येही त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली.

याच दरम्यान ते वयाच्या तिशीत पोहोचले. लग्नासाठी चित्रकार मुलगी हवी अशी त्यांनी जाहिरात दिली. नेमकी त्यांच्या कुटुंबियांच्या ती वाचनातं आली. यथावकाश त्यांना सुयोग्य अशी चित्रकार पत्नी, आयुष्याची जोडीदार मिळाली. त्यांना बाहेरगावाहून कधी पत्रे लिहिली तर त्यात शब्द मोजकेच; मात्र चित्रेच जास्त; अशा प्रेमाच्या आठवणी लाहोटी सांगतात.

मुळगावकर, एस एम पंडित, दीनानाथ दलालाची शैली ही लाहोटी यांच्यावर प्रभाव टाकणारी ठरली. प्रत्येक चित्रकार वेगवेगळ्या प्रतलातून जातो. कलाक्षेत्रात त्याला ‘आर्टिस्टचे पिरिअड’ असे संबोधले जाते. लाहोटींचा सुरुवातीचा पिरियड होता निसर्गचित्रे, व्यक्तिरेखाटने, रचनाचित्रे. मग त्यांचा स्वतःची शैली शोधण्याचा; विकसित करण्याचा प्रयास सुरु झाला. देशात व परदेशात प्रवास करून त्यांच्या अनुभवात, चित्रात आणखी परिपक्वता आली.

त्यानंतर त्यांनी आजपर्यंत ऍबस्ट्रॅक्ट – अमूर्त चित्रात प्रचंड मोठे काम केले. प्रायोगिकतेच्या ध्यासातून वेगवेगळ्या माध्यमात काम केले. पेंटिंग्स, म्युरल्स केली. धातू, फायबर, मशीनचे सुटे भाग आणि जलरंग, ऍक्रॅलिक, ऑईल्स अशी अनेक माध्यमे अभ्यासली. त्यातून नवी चित्रे घडत गेली. चित्रांची रंगसंगती, रचना व संशोधनातून त्याला दिलेला पोत हे त्यांच्या पेंटिंगचे वैशिट्य !

चित्रसाधनेबाबत ते संगीताच्या भाषेतही बोलतात. स्टुडिओत मी रोज स्केचेसने सुरुवात करतो. जणू काही संगीताप्रमाणे रियाझ करतो. सूर लावतो. रात्री काम करताना गज़ल ऐकतो. चित्र हाच माझा एकमेव उद्देश ! मार्ग ! दिनक्रम ! दुसरी कोणतीच प्रलोभने नाहीत. चित्रकला हाच माझा धर्म ! हेच माझे जीवन ! आज चित्र आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात देशविदेशात नाव कमावल्यानंतरही लाहोटी कलादालनांना भेटी देतात. उत्साहाने नवोदित चित्रकारांना मार्गदर्शन करतात. पुण्यातील ओक स्मृती प्रदर्शनाच्या नियोजनात दरवर्षी हातभार लावतात. पुण्याची चित्रकलेबाबतीत ओळख वाढावी ही त्यांची तळमळ !

Leave a Comment