ऑस्ट्रियात बनलाय बिअरचा स्विमिंग पूल


थंडीचे दिवस आता जवळ येत चालले आहेत. या काळात सुट्या, सणांची रेलचेल असते व त्यामुळे प्रवासाचे बेतही मोठ्या प्रमाणावर आखले जातात. आपण जर आंतरराष्ट्रीय प्रवासाचा बेत आखत असाल तर युरोपातील नितांतसुंदर देश ऑस्ट्रियाचा जरूर विचार करा. कारण येथे एक अनोखे आकर्षण आपली प्रतिक्षा करत आहे. ऑस्ट्रियातील टर्रेज मध्ये एक आगळावेगळा स्विमिंग पूल उघडण्यात आला आहे. या स्विमिंग पूलमध्ये पाणी नाही तर बिअर भरली गेली आहे. जगातला हा पहिलाच बिअर पूल असल्याचे सांगितले जाते.

मद्य उत्पादक कंपनी स्टारर्कनबर्गर ने एका जुन्या आलिशान महालात असे सात बिअर स्विमिंग पूल तयार केले आहेत. यात काठोकाठ बिअर भरली गेली आहे. प्रत्येक पुलाची लांबी १३ फूट आहे व आरामात बसता येईल अथवा डुंबता येईल इतके हे पूल खोल आहेत. ऑस्ट्रियात हे थंडीचे दिवस असल्याने पूलमध्ये गरम बिअर भरण्याची व्यवस्था केली गेली आहे. या बियरमध्ये थोडे पाणीही मिसळले गेले आहे आणि हे मिश्रण वारंवार बदलले जात नाही. त्यामुळे या पूलमध्ये जरूर डुंबा पण त्यातील बिअर पिऊ नका असा सल्ला दिला गेला आहे. अर्थात बियरच्या पूलमध्ये डुंबताना बिअर प्यायची असेल तर त्यासाठी वेगळी सोय आहे. येथे तुमच्या ऑर्डरनुसार चिल्ड बियर तुम्हाला पुरविली जाणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, की बिअर ही त्वचेचे आरोग्य व केसांच्या आरेाग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.