इंटरनेटवर ‘ब्लू व्हेल’चे सर्वाधिक शोधक कोलकात्यामध्ये


कुठल्याही गोष्टीसाठी जागतिक प्रसिद्धी मिळणे ही जगातील एखाद्या शहरासाठी फार अभिमानाची बाब आहे. मात्र भारतातील कोलकाता या शहराला ज्या कारणाकरिता जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळत आहे, ती बाब अभिमानाची नसून, धक्कादायक आणि काळजी करायला लाणारी आहे. ‘ ब्लू व्हेल चॅलेंज ‘ या कुप्रसिद्ध, जीवघेण्या गेम ला इंटरनेट वर, जागतिक स्तरावर सर्वाधिक सर्च नोंदविल्या गेलेल्या महानगरांमध्ये कोलकाता या शहराचाही समावेश असल्याचे ‘ गुगल ट्रेंड्स ‘ च्या रिपोर्ट मध्ये म्हटलेले आहे. गेल्या बारा महिन्यांमध्ये कोलकाता येथून ब्लू व्हेल च्या इंटरनेट सर्च च्या संख्येमध्ये शंभर टक्के वाढ झाली असल्याचेही हे रिपोर्ट म्हणतात. जगभरामध्ये ब्लू व्हेल चे सर्वाधिक सर्च नोंदिविलेल्या महानगरांची यादी नुकतीच गूगलने प्रसिद्ध केली. या मध्ये भारतातील कोलकातासह, गुवाहाटी, नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळूरू, मुंबई आणि हावडा या शहरांचा ही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘ब्लू व्हेल चॅलेंज ‘ ह्या कुप्रसिद्ध आणि जीवघेण्या खेळाने जगभरातील अनेक किशोरवयीन मुलांचे प्राण घेतले आहेत. या खेळामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूला या खेळाच्या अॅडमिनिस्ट्रेटर कडून स्वीकृती मिळवावी लागते. त्यानंतरच्या पन्नास दिवसांच्या या खेळामध्ये खेळाडूला एकेक आव्हान स्वीकारून ते आपण पूर्ण केले असल्याचा पुरावा छायाचित्रांच्या मार्फत द्यावा लागतो. खेळाडूंसमोर असणारी ही आव्हानेही भयानक शारीरिक हानी पोहोचविणारी असतात. उंच इमारतींच्या कठड्यांवर उभे राहणे, सुयांनी किंवा सुरीने स्वतःच्या शरीरावर जखमा करून घेणे अशी भयंकर आव्हाने खेळाडूंसमोर ठेवली जातात. ही आव्हाने स्वीकारण्यास खेळाडूंना भाग पाडले जाते. या गेमचा शेवट खेळाडूच्या आत्महत्येने होतो.

या भयंकर खेळामुळे केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश इत्यादी प्रांतांमधील किशोरवयीन मुलांनी आपले जीव गमाविल्याच्या घटना नुकत्याच घडून गेल्या आहेत. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आय टी या मंत्रालयाने गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि याहू यांना ‘ ब्लू व्हेल ‘ चे लिंक त्यांच्या वेबसाईट्स वरून ताबडतोब हटविण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment