पावलांमधून येणारी दुर्गंधी अशी दूर करा


एखाद्याने आपल्या पायांमधून बूट काढता क्षणी एक विचित्र दुर्गंधी पसरते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सतत घाम येत असताना पाय बुटांमध्ये सतत बंद राहिल्यामुळे ही दुर्गंधी येते. पावसाळ्यामध्ये ही बूट पाण्यात भिजल्याने आणि तेच ओले बूट पायात घालून ठेवलयानेही अशी दुर्गंधी उद्भवू शकते. पावले सतत बुटांमध्ये बंद राहून त्यांच्यामध्ये आर्द्रता निर्माण होते. या आर्द्रतेमुळे पावलांमध्ये बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव होतो. यामुळेच पावलांमधून विचित्र दुर्गंधी येत असते. अशी दुर्गंधी आपल्या पावलांमधून जाणाविल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता त्वरित उपाय करावेत. या करिता अनेक घरगुती उपायांचा अवलंब करता येईल.

मीठा मुळे त्वचेतील आर्द्रता कमी होऊन घाम येण्यावर ही नियंत्रण राहते. त्यामुळे आपल्या पावलांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याला आळा बसतो. एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी भरून घेऊन त्यामध्ये दोन टेबलस्पून मीठ घालावे. या मिठाच्या पाण्यामध्ये आपली पावले वीस मिनिटे बुडवून ठेवावीत. हा उपाय दररोज करण्यासही हरकत नाही. तसेच गरम पाण्यामध्ये व्हिनेगर घालून त्यामध्ये आपली पावले बुडवून ठेवल्याने ही पावलांमधून येणारी दुर्गंधी नाहीशी होते. या साठी गरम पाणी ज्या प्रमाणात घेतले आहे, त्याच्या निम्मे व्हिनेगर त्यात घालावे.

चहामधील अॅसिड्स मुळे पावलांमधील रंध्रे मोकळी होऊन घाम येण्याचे प्रमाण कमी होते. या खेरीज चहा हा बॅक्टेरिया नाहीसे करणारे प्राकृतिक अँटीबायोटिक आहे. त्यामुळे पावलांची दुर्गंधी कमी करण्यास चहा उपयोगी आहे. एक मोठा कपभरून गरम पाण्यामध्ये चहाच्या दोन टी बॅग्स टाकाव्या. त्यानंतर हे पाणी पंधरा मिनिटे उकळू द्यावे. नंतर या पाण्यामध्ये चार कप थंड पाणी घालून त्यामध्ये आपली पावले बुडवून ठेवावीत. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा.

लव्हेंडर ऑईल नुसतेच उत्तम सुगंध देत नाही, तर त्यात अँटी फंगल गुणधर्म आहेत. एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये लव्हेंडर ऑइल चे काही थेंब टाकावेत. या मध्ये आपली पावले बुडवून ठेवावीत. या मुळे पावलांची दुर्गंधी दूर होईलच, शिवाय रात्री शांत झोपही लागेल. त्याचप्रमाणे खाण्याचा सोडाही पावलांची दुर्गंधी दूर करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामध्ये बॅक्टेरिया मारण्याचे गुणधर्म असून, पावले मऊ होण्यासही सोडा सहाय्यकार आहे. एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये तीन टेबलस्पून खाण्याचा सोडा घालावा. त्यामधे एका लिंबाचा रसही घालावा. या पाण्यामध्ये आपली पावले वीस मिनिटे बुडवून ठेवावीत.

या घरगुती उपायांपैकी सर्वच उपाय पावलांची दुर्गंधी कमी करण्यासाठी फायदेकारक आहेत. आपली पावले गरम पाण्यामध्ये बुडवून बाहेर काढल्यानंतर स्वच्छ टॉवेल ने पुसून व्यवस्थित कोरडी करून त्यावर अँटी बॅक्टेरियल पावडर टाकावी.