हवामानाशास्त्रात करा करिअर


हवामानशास्त्र क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर युवकांसमोर नोकऱ्यांचे अनेक पर्याय खुले होतात. सर्वाधिक पर्याय सरकारी क्षेत्रात आहेत. या विषयातील प्रशिक्षित युवकांना प्रोफेशनल इंडियन मेटेरिऑलॉजी डिपार्टमेन्ट, वायुसेना, नौदल, इस्रो, डीआरडीओ, स्पेस ऍप्लिकेशन सेन्टर, इंडियन सेन्टर ऑफ ट्रॉपिकल मेटेरिऑलॉजी, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी अशा अनेक संस्थांमध्ये काम करण्याची संधी आहे.

हवामानाच्या क्षेत्राचे महत्त्व जसजसे वाढत आहे, तसतशी या क्षेत्रात तज्ज्ञांची गरजही वाढत आहे. तज्ज्ञांची आवश्‍यकता केवळ हवामानशास्त्र विभागातच नव्हे तर अंतरिक्ष केंद्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि प्रदूषण नियंत्रण संस्थांमध्येही भासते. त्याच कारणामुळे हवामानशास्त्र म्हणजेच मेटेरिऑलॉजी विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. या विषयात मुख्यत्वे हवामानातील बदल, हवेचा दबाव आणि दिशा, तसेच वातावरणातील आर्द्रतेचा अभ्यास केला जातो. अलीकडच्या काळात या क्षेत्रात अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे हे क्षेत्र अधिक रोचक बनले आहे.

इस्रोसारख्या अंतरिक्ष संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र प्रक्षेपणासारखे कार्यक्रम हवामानाचे पूर्वानुमान लावल्यानंतरच निश्‍चित केले जातात. सध्या हळूहळू काही खासगी कंपन्याही ऍट्‌मॉस्फेरिक सायन्टिस्ट्‌सना (हवामान शास्त्रज्ञ) आपल्याकडे संधी उपलब्ध करून देत आहेत. प्रशिक्षित हवामानतज्ज्ञ प्रदूषण रोखण्यातही निष्णात मानले जातात. जागतिक तापमानवाढीमुळे येत असलेल्या संकटांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्यामुळे परदेशांतही अशा तज्ज्ञांना मोठी मागणी आहे.

वस्तुतः हवामानशास्त्रात अनेक शाखा आहेत. हवामानशास्त्रात मुख्यत्वे हवामानाशी संबंधित नैसर्गिक घडामोडी आणि त्यांच्याशी संलग्न पूर्वानुमान याविषयी अभ्यास केला जातो. हे एक विस्तृत आणि सर्वसमावेशक असे क्षेत्र आहे. या क्षेत्रात क्‍लायमेटॉलॉजी, सिनॉप्टिक मेटेरिऑलॉजी, डायनॅमिक मेटेरिऑलॉजी, फिजिकल मेटेरिऑलॉजी, ऍग्रीकल्चरल मेटेरिऑलॉजी, अप्लाइड मेटेरिऑलॉजी अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. या क्षेत्रात परिचालन, संशोधन आणि संचालन ही कामे मुख्यत्वे केली जातात. या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना हवामान शास्त्रज्ञ म्हणजेच मेटेरिऑलॉजिस्ट म्हणून ओळखले जाते.

हवामानशास्त्राच्या क्षेत्रात प्रशिक्षित तज्ज्ञांचे वर्गीकरण ए आणि बी अशा दोन गटांत केले जाते. या दोन्ही वर्गांमधील तज्ज्ञांना मोठा पगार मिळतो. शास्त्रज्ञांचे सुरुवातीचे वेतनच 40 हजार रुपये किंवा त्याहून अधिक असते. अनुभव प्राप्त केल्यानंतर असे शास्त्रज्ञ महिन्याकाठी एक लाख रुपयांपेक्षाही अधिक कमाई करू शकतात. सध्याच्या काळात जलवायू परिवर्तनाचा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. जलवायू चक्र वेगाने विचलित झाल्यामुळे अनेक बदल घडत आहेत. अशा स्थितीत हवामानाचे पूर्वानुमान करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

हवामानातील बदलांच्या बाबतीत सामान्य लोकही आता अधिक जागरूक झाले आहेत. विमानोड्डाणाचे क्षेत्र असो वा संशोधनाचे क्षेत्र असो, हवामानाच्या बाबतीत तज्ज्ञ असलेल्यांना सर्वच क्षेत्रांत मोठी मागणी आहे. देशातील विमान वाहतूक उद्योग आज खूपच वाढला आहे. लष्कर, वायुसेना, नौदलामध्येही अत्यंत महागडी विमाने आहेत. या सर्वांच्या दृष्टीने उड्डाणातील सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. भारतीय हवामानशास्त्र विभागातही नोकऱ्यांचे काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी सध्या संगणकीय प्रणालीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे संगणक विज्ञान शाखेतील युवकांनीही करिअरसाठी या पर्यायाचा विचार करणे फायदेशीर आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरिऑलॉजी (पुणे), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बेंगळुरू) या हवामान क्षेत्रातील शिक्षणासाठीच्या काही महत्त्वाच्या संस्था होत. हवामानातील बदल, त्यामुळे होत असलेले दुष्परिणाम, वाढत्या प्रदूषणाचे गांभीर्य आणि जलवायू चक्रातील परिवर्तनामुळे होत असलेले प्रतिकूल परिणाम या साऱ्याचा विचार करता या क्षेत्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार असून, या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार युवकांनी केल्यास भविष्यात मोठी संधी त्यांना मिळू शकते.

Leave a Comment