हलाल होण्यापूर्वी बकऱ्यांना स्पा ट्रीटमेन्ट


३०० रुपयांच्या खर्चामध्ये गरम पाण्याने आंघोळ, आणि ३००० रुपयांचे पॅकज घेतल्यास स्पा, बॉडी मसाज, शॅम्पू, अंगावरील केसांची चमक वाढविण्यासाठी खास कंडीशनर.. हे सगळे कुठल्या ब्युटी पार्लर चे पॅकज नसून, खास बकरी ईद च्या निमित्ताने बकऱ्यांसाठी दिल्या गेलल्या खास ब्युटी ट्रीटमेन्ट आहेत. नुकत्याच साजऱ्या करण्यात आलेल्या बकरी ईद च्या दीवशी हजारो बकऱ्या हलाल केल्या जातात. बकरी ईद च्या दिवशी बकरी हलाल करण्यास मोठे महत्व आहे. पण भोपाल येथे असलेल्या सरकारी पशुवैद्यकीय इस्पितळामध्ये मात्र हलाल होण्यापूर्वी बकऱ्यांना विशेष ब्युटी ट्रीटमेन्ट घेण्याची सोय करण्यात आली होती. बकऱ्यांच्या मालकांच्या इच्छेनुसार त्यांच्या बकऱ्यांना ब्युटी ट्रीटमेन्ट दिल्या गेल्या. ३०० रुपयांमध्ये गरम पाण्याने आंघोळीपासून ते ३००० रुपयांच्या सम्पूर्ण ब्युटी पॅकेज पर्यंत सर्व काही या ट्रीटमेन्ट समाविष्ट करण्यात आले होते. या वेळी स्पा ट्रीटमेन्ट साठी आलेल्या बकऱ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.

या स्पा ट्रीटमेन्ट मुळे बकऱ्या चांगल्या दिसू लागल्याचे येथील पशुतज्ञांनी सांगितले. स्पा मुळे बकऱ्यांच्या त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन बकऱ्या स्वच्छ दिसत असल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर बकऱ्यांच्या अंगावर किंवा केसांमध्ये रक्तपिपासू जीवाणू असण्याची शक्यता असते. या जीवाणूंमुळे बकऱ्यांना अनेक प्रकारच्या रोगांचा संसर्ग होऊ शकतो, आणि त्यांचे मांस खाणे मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. या स्पा ट्रीटमेन्ट मध्ये बकऱ्यांच्या अंगावर रक्तपिपासू जीवाणू आढळल्यास, त्यांचा ही नायनाट करण्यात येत असल्याने, बकऱ्या संपूर्णपणे निरोगी राहतात.

भोपालच्या सरकारी पशुवैद्यकीय इस्पितळामध्ये पाळीव प्राण्यांसाठी स्पा ट्रीटमेन्ट आधीपासूनच उपलब्ध होत्या. बहुतेक करून कुत्री किंवा मांजरी या ट्रीटमेन्ट साठी आणल्या जातात. पण गेल्या वर्षी पसून खास बकरी ईदच्या निमित्ताने, बकऱ्याही या ब्युटी ट्रीटमेन्ट करिता आणल्या जात आहेत.