पर्यटकांसाठी अन-डिस्कव्हर्ड सागरकिनारे होणार सज्ज

मुंबई दि.२१-महाराष्ट्राला निसर्गदृष्ट्या लाभलेल्या ७२० किमीच्या सागर किनारपट्टीतील वीस एकाकी समुद्र किनारे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र पर्यटन विभागाने या प्रकल्पाला यापूर्वीच हिरवा कंदिल दाखविला आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून दुर्लक्षित राहिलेले हे नितांतसुंदर सागरकिनारे निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील किनार्‍यांचा सर्वाधिक समावेश आहे.

पर्यटन मंत्रालयाचे मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यासंबंधी अधिक माहिती देताना म्हणाले की, गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सागरकिनारे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गोव्यातील स्वच्छ, सुंदर किनार्‍यावर लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. महाराष्ट्राची किनारपट्टीही सुंदर आहे आणि आपल्याकडेही असे किनारे आहेत. त्यातील गणपतीपुळे, वेंगुर्ला, तारकर्ली, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, अलिबाग, डहाणू, बोर्डी ,वेळणेश्वर यासारखे किनारे सोडले तर बाकी किनारे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेले नाहीत.

आता पर्यटकांना परिचित झालेल्या किनार्‍यांपेक्षा हे किनारे वेगळेच आहेत. सुदैवाने त्यांच्या विकासासाठी मोठ्या अनुदानाची गरज नाही. फक्त तेथे जाण्यासाठी रस्ते, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक सुविधा उपलब्ध करायच्या आहेत. एक वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण केले जाणार असून यात वीस सागरकिनारे पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत.

Leave a Comment