तिरूपती बालाजीचा तिरूमला

sahastrakund

आंध्र प्रदेशाच्या हद्दीत पण तमीळनाडूला अधिक जवळचे असलेले पूर्व घाटातील घनदाट अरण्यांची साथसंगत घेऊन नटलेले देवळांचे शहर म्हणून तिरूपती प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान आणि दरवर्षी करोडो भाविक ज्याला भेट देतात ते तिरूमला देवस्थान म्हणजे जगप्रसिद्ध वेंकटेश अथवा बालाजीचे स्थान. वेंकटेश म्हणजे सात टेकड्यांचा राजाच. विष्णूचा कलियुगातील अवतार अशीही त्याची ख्याती. सात पर्वतांची ही रांग वरून पाहिली असता एखाद्या नागाप्रमाणे नागमोडी दिसते. तिरूमला म्हणजे या नागाची फडा. जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे हे स्थान अतिशय निसर्गरम्य परिसरात आणि नानाविध सौंदर्यस्थळे घेऊन सजले आहे. मात्र मुख्य उद्देश बालाजी अथवा वेंकटेशाचे दर्शन हाच.

तिरूपती गावात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस तसेच विमानानेही जाता येते. तिरूपती हे पायथ्याचे गांव आणि येथूनच तिरूमलाचा डोंगर चढायचा. अनेक भाविक आजही पायी हा डोंगर चढून जातात. पण देवस्थान तसेच खासगी बसेस, टॅक्सीनेही वर जाता येते. सुंदर घाटरस्ता आपल्याला तिरूमलाला घेऊन जातो. वर पोहोचल्यावर देवस्थानतर्फेच अतिशय सुसज्ज अशा धर्मशाळा आहेत. परिसराची स्वच्छता फारच चांगली. जेवणाखाणाची व्यवस्था उत्तम. देवस्थानने ठरवून दिलेल्या माफक दरातच या सर्व सेवा भाविकांना पुरविल्या जातात. तसेच आजूबाजूच्या स्थळांना भेटी देण्यासाठी संस्थानच्याच बसेस सतत फिरत असतात.

बालाजीच्या या स्थानाचा उल्लेख पुरातन ग्रंथातूनही आढळतो. पल्लव, पांडव, चोल साम्राज्ये तसेच ऐतिहासिकदृष्ट्या अलिकडचे म्हटले जाणारे विजयनगर हे सर्व राजे बालाजी भक्त होते. बालाजीचे मंदिर म्हणजे प्राचीन भारतीय मंदिर वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना. संपूर्ण दगडी बांधकाम. अतिशय प्रचंड. दक्षिण भारतीय बांधकाम शैलीचा मंदिरावरचा विजयमंडप आणि ध्वजस्तंभ.हे दोन्ही संपूर्ण सोन्याने मढविलेले आहेत. भाविकांना दर्शनासाठी रांग लावावी लागते आणि गर्दीनुसार दर्शन व्हायला अगदी चारपाच तासांपासून चोवीस तासही प्रतिक्षा करावी लागते.मात्र दर्शनाची रांगही अगदी शिस्तीत असते. चेंगराचेंगरी, धक्काबुक्की कांही नाही. बालाजीजवळ जसे आपण पोहोचतो तेथे मात्र दर्शनासाठी एकच झुंबड असते. आत खोलवर गाभार्‍यातील ही विष्णूमूर्ती मंद दिव्यांच्या किवा समयांच्या प्रकाशातही नुसती झळाळत असते. दर्शनमात्रे मन कामना पुरती याचा अनुभव यायलाच हवा. बालाजीच्या सोन्याहिर्‍या माणकांनी मढलेल्या या मूर्तीचे क्षणभराचे दर्शनही कृतार्थ झाल्याची भावना मनात जागवतेच. संपूर्ण दर्शनमार्गावर सतत गोविंदा,  वेंकटरमणा गोविंदा असा गजर भक्तगण करत असतात.

बालाजीचे दर्शन झाले की प्रसादाची प्रतीक्षा. भलामोठा,साजूक तुपातला, सुक्यामेव्याने नटलेला बुंदीचा लाडू हाच प्रसाद. येथील उपहारगृहातील अल्पदरात जेवणाची उत्तम सोय आहे. हिंदी, मराठी भाषा इल्ला त्यामुळे अदक्षिणप्रांतीयांची संभाषणाची थोडी पंचाइतच असते.

बालाजीच्या दर्शनापूर्वी जवळच असलेल्या पुष्करिणी तळ्यात स्नान करण्याची प्रथा आहे. विष्णूच्या क्रीडेसाठी हे पाणी गरूडाने थेट स्वर्गातून पृथ्वीवर वेंकटेशासाठी आणले असे सांगितले जाते. आकाशगंगेलाही भेट द्यायचीच. मंदिरापासून साधारण साडेतीन किमीवर असलेले हे स्थान म्हणजे विष्णूच्या पाऊलातून निघालेला हा प्रवाह असा वेदांत उल्लेख आहे म्हणे !  मंदिरातील नित्य पूजाअर्चेसाठी हेच तीर्थ वापरले जाते.

निसर्गातील आश्चर्य समजली जाणारी आशियातील एकमेव अशी नैसर्गिक दगडी कमान हे येथील आणखी एक आकर्षण. जगात अशाप्रकारच्या तीन कमानी आहेत. अमेरिकेतील रेनबो आर्च,  यूकेतील कट थ्रू आणि ही तिसरी. याला म्हणतात शिलातोरणम. ही कमान १५०० दशलक्ष वर्षे जुनी असल्याचे पुरातत्त्व तज्ञांचे म्हणणे आहे. हवेचा आणि वार्‍याचा परिणाम होऊन बनलेली ही कमान २५ फूट लांब आणि १० फूट उंच आहे. विष्णूच्या बालाजी या अवताराने या कमानीवरच प्रथम दर्शन दिले असेही सांगितले जाते.

वेंकटेश आणि पद्मादेवी यांचा विवाहसोहळा जेथे पार पडला ते गांव म्हणजे नारायणवनम. ३६ किमीवर असलेल्या या गावाला भेट द्यायला हवीच. तसेच तिरूमला डोंगरावरच असलेले कपिलतीर्थही पाहायला हवेच. येथे कपिलऋषींसमोर भगवान शंकर अवतीर्ण झाले असे म्हटले जाते. येथे आहे सुंदर धबधबा. तिरूमलावरून खाली तिरूपती गावात आले की गोविंदस्वामींचे मंदिर व अन्य मंदिरेही पाहायची. हे गोविंदस्वामी म्हणजे वेंकटेशाची बंधू. वेंकटेशाच्या लग्नात ते इतके दमले की मापटे उशाला घेऊन ते गाढ झोपले. ही मूर्ती अशाच स्वरूपात आहे.

तिरूपती गावातही अनेक हॉटेल्स आहेत. राहण्याजेवण्याची उत्तम व्यवस्था आहे. येथे मुक्काम करून भल्या पहाटे तिरूमलाला जायचे अथवा रात्रीच तिरूमलाला जाऊन पहाटे दर्शनबारीत उभे राहायचे. मग कधी निघताय बालाजीच्या दर्शनाला? एक टीप देऊ? येथे जाण्यासाठी साधारण फेब्रुवारी मार्चचा सीझन चांगला. हा काळ परिक्षांचा असल्याने गर्दी थोडी कमी असते. थोडीच बरं का! आणखीही असे सांगितले जाते की आपण कितीही बालाजीच्या दर्शनाचा बेत केला तरी त्याचे बोलावणे आल्याशिवाय आपल्याला दर्शनाचा योग येत नाही. चला मग म्हणा,
वेंकटरमणा, गोविंदा !

Leave a Comment