डेअरी टेक्नॉलॉजी

दिवसेंदिवस दुधाचे उत्पादन आणि वापर यात प्रचंड वाढ होत आहे आणि केवळ शेतकर्‍यांनी करावयाचा व्यवसाय असे त्याचे मर्यादित स्वरूप राहिलेले नाही. दुधाचे उत्पादन, प्रक्रिया, वितरण आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचे मार्केटिंग या गोष्टी करण्यासाठी शास्त्रीय प्रयत्न करण्याची गरज वाटायला लागली आहे. म्हणूनच या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज तीव्रतेने जाणवायला लागली आहे. अमेरिका, न्यूझीलंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशात तर दुग्ध व्यवसाय करणारे बडे उद्योगपती हजारो प्रशिक्षित तरुणांच्या शोधात आहेत. त्यामुळे डेअरी टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना विशेषतः पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे केवळ दुधाचेच उत्पादन नव्हे तर आइस्क्रीम, चॉकलेट यांच्या उत्पादनाचा समावेशही डेअरी टेक्नॉलॉजीमध्येच केला जायला लागला आहे. कॅडबरी, नेस्ले, ग्लॅक्सो, अमूल, वेरका अशा कंपन्या आईस्क्रिम आणि चॉकलेटचे उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणावर करायला लागल्यामुळे त्यांना उत्पादन, वितरण आणि क्वॉलिटी कंट्रोल इत्यादी कामांमध्ये अशा पदवीधरांची गरज वाटायला लागली आहे.

डेअरी टेक्नॉलॉजी हा तसा अनेक शास्त्रांचा संगम झालेला अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये जनावरांच्या जोपासनेपासून सुरुवात होते आणि आधुनिक प्रकारच्या बाजारामध्ये आपली उत्पादने कशी विकावीत इथपर्यंत शिक्षण घ्यावे लागते. म्हणजे पशुपालन, पशू संवर्धन, दूध प्रक्रिया, विक्री, विपण्णन, बायोटेक्नॉलॉजी, व्यवस्थापन अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट होतो. या शास्त्रामध्ये पदविकेपासून (डिप्लोमा) पीएच.डी. पर्यंत सगळ्या प्रकारच्या शिक्षणाची सोय भारतामध्ये झालेली आहे. विविध कृषी महाविद्यालयांमध्ये हे शिक्षण दिले जाते. विशेषतः डेअरी टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याकरिता कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. बारावीला पदार्थ विज्ञान, रसायन, गणित हे कंपल्सरी विषय घेणारे विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला बसू शकतात. त्यातून बी.एस्सी. (डेअरी टेक्नॉलॉजी)ला प्रवेश दिले जातात. काही कृषी विद्यापीठांमध्ये आता एम.एस्सी. (डेअरी टेक्नॉलॉजी) म्हणजे पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय झालेली आहे. महाराष्ट्रात मुंबईमध्ये डेअरी सायन्स इन्स्टिट्यूट ही संस्था आहे आणि या संस्थेत डॉक्टरेटपर्यंतची शिक्षण देण्याची सोय आहे. त्याशिवाय जबलपूर (मध्य प्रदेश) येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड अॅग्रीकल्चर या महाविद्यालयातही दुग्ध व्यवसायाचे हे प्रगत शिक्षण दिले जाते. राजस्थानातील उदयपूर येथील राजस्थान अॅग्रीकल्चरल युनिर्व्हसिटीच्या कॉलेज ऑफ डेअरी सायन्स या संस्थेतील दुग्ध व्यवसायाचे शिक्षणही नावाजले गेलेले आहे. कोलकत्ता येथे तर या विषयाला पूर्ण विद्यापीठ वाहिलेले आहे. वेस्ट बेंगॉल युनिर्व्हसिटी ऑफ अॅनिमल अॅन्ड फिशरी सायन्सेस् हे ते विद्यापीठ असून या विद्यापीठात डेअरी टेक्नॉलॉजीच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे.

Leave a Comment