काश्मीर दर्शन क्षीरदेवी आणि मानसबल

kashmir

श्रीनगरपासून साधारण दोन तासांचा रस्ता. उंचचउंच विलो वृक्षांच्या मधून जाणारा. जणू ग्रीन टनेलच. मधूनमधून डोकावणारी छोटी छोटी खेडी. दूरवर पसरलेली भाताची शेते आणि मोहरीची शेते. बर्फाच्छादित डोंगरशिखरांची साथ तर कायमचीच. मोहरीची पिवळीधमक फुले आकाशाच्या निळ्याभोर पार्श्वभूमीवर आणि निळ्याजांभळ्या डोंगररांगाशी रंगाचा सुरेख मेळ साधणारी. रस्ताच जर इतका सुंदर तर जेथे चाललो होतो ते सरोवर आणि पुराणकालीन मंदिर कसे असेल याची उत्सुकता क्षणोक्षणी ताणत चाललेली.

साधारण तास दीडतासाच्या प्रवासानंतर पोहोचलो मानसबल सरोवरापाशी. दल सरोवरासारखेच नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले पाणी. पण दलसरोवरासारखी शिकारे, हाऊसबोटींची गर्दी नसलेले. मधूनमधून उडणारी कारंजी. सरोवराच्या काठावर तयार केलेली सुंदर बाग. अगदी शांत वातावरण. लोकांची वर्दळही फारशी नाहीच. दाट छायेच्या झाडांखाली बसून नुसते सरोवराकडे पाहात राहिले तरी मेडिटेशनचा अनुभव येत होता. मन आतून शांत शांत होत होते. अगदी कोणाशी कांही बोलूही नये आणि दिसते आहे ते सौंदर्य नुसते डोळ्यांनी पीत राहावे अशा अवस्थेत किती काळ गेला कळलेही नाही.

पुढचा टप्पा होता क्षीरदेवी. काश्मीरी भाषेत खीरदेवी. प्रचंड मोठे वैशिष्टपूर्ण मंदिर. दगडी बांधकामाचे.शिवलिंगाच्या आकारात बांधलेले. अष्टकोनी. रावणाने उपासना करून या देवीला प्रसन्न करून घेतले होते आणि तिला लंकेला नेले होते. मात्र तेथे रावणाचा चाललेला अनाचार पाहून देवी रागावली आणि तिने हनुमानाला अशा ठिकाणी ने की, जेथे कोणी येऊ शकणार नाही असा आदेश दिला. हनुमानाने तिला येथे हिमालयात आणले आणि या ठिकाणी देवी राहिली अशी आख्यायिका. देवीचे प्रत्यक्ष गाभारा मंदिर अगदी छोटे आणि कुंडात असलेले. मूर्ती दूरून दिसत नव्हती पण फोटो लावले होते त्यातून ही मूर्ती अतिसुंदर,रेखीव आणि अतिशय प्रमाणबद्ध असल्याचे दिसत होते. देवीचे गाभारा मंदिर ज्या कुंडात आहे, तेथले पाणी दुधी रंगाचे. म्हणून ही खीरदेवी. कोणते संकट येणार असेल तर हे पाणी काळे होते असे तेथील पुजार्‍यांनी सांगितले.

मंदिराच्या आवारातच दूत हनुमानाचे ही देऊळ. हनुमानाची मूर्तीही अतिशय छान. या देवळाच्या प्रचंड आवारात लक्षात राहिली ती चिनार वृक्षाची झाडे. काश्मीर म्हटले की चिनार हवेतच. अन्य ठिकाणीही हे वृक्ष पाहिले होतेच. पण या मंदिरातले वृक्ष खूप वर्षांचे जुने असावेत कारण एकेका वृक्षाचा घेर म्हणजे खोडाला चारपाच जणांनी हातात हात धरून वेढले तरी कवेत न येणारा. काय काय पाहिले असेल या वृक्षांनी आत्तापर्यंत, उगीचच मनात विचार आला आणि न कळत दोन्ही हातांची मिठी या वृक्षांना पडली. न सांगता येणार्‍या समाधानाचा अनुभव पुरेपुर घेतला. देवीला, हनुमानाला आणि या वृक्षांना नमस्कार करून त्यांचा अक्षरशः निरोप घेतला. पाय निघत नव्हता पण जाणे तर भागच होते ना !
आता येथून श्रीनगर आणि पुन्हा आपल्या गावी परतायचे. पुन्हा कधी काश्मीरला येणे होईल काय माहिती?

Leave a Comment