इंग्रजीची पदवी उपयुक्त

english

सध्या विविध विद्या शाखांच्या प्रवेशाच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि साधारणतः चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी विज्ञान, संगणक, अभियांत्रिकी, वैद्यकीय या शाखांकडे वळताना दिसत आहेत. या शाखांना एवढी मागणी आहे की, दहावी ८५ टक्के गुण मिळवून सुद्धा इकडे प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. दुसर्‍या बाजूला कला शाखेला प्रवेश घ्यायला कोणी तयार नाही. ३५ टक्के मार्क मिळविणाराही कला शाखेला जाऊ शकतो. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक मोठा दोष आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांचा हा प्रवेशाचा कल त्याच्या आवडीने ठरत नाही तर चांगली नोकरी मिळण्याची शक्यता या एका निकषावर ठरतो. कला शाखेचे शिक्षण घेणार्‍याला चांगली नोकरी मिळायचीच नाही असे सर्वांनीच गृहित धरलेली असल्यामुळे कला शाखेकडे कोणी जातच नाही. त्यामुळे ज्यांना कोठेच प्रवेश मिळत नाही असे सुमार दर्जाचे विद्यार्थी कला शाखेकडे वळतात आणि त्यातून वारंवार कला शाखेला काही मागणी नाही असे वातावरण तयार होत राहते. प्रत्यक्षात कला शाखेतल्या इंग्रजी वाङ्मयाच्या पदवीला तरी निश्चितपणे चांगली मागणी आहे. तेव्हा कला शाखेला प्रवेश घेऊन एम.ए.(इंग्रजी) करून इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून चांगले करीअर करता येते, याकडे लोकांचे लक्षच राहिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तरी फार हिरीरीने इंग्रजी वाङ्मयाकडे वळणारी मुलेच दिसत नाहीत. मुळातच महाराष्ट्रामध्ये इंग्रजीकडे ओढाही नाही आणि इंग्रजीचे चांगले शिक्षणही मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात इंग्रजी प्राध्यापकांच्या जागा भरायच्या झाल्या की दक्षिण भारतातच ते शोधावे लागतात आणि अनेक महाविद्यालयांमध्ये केरळ, तामिळनाडू किवा कर्नाटकातले प्राध्यापक आलेले दिसतात. ही परिस्थिती केवळ महाविद्यालयातच आहे असे नाही. इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा ती तशीच आहे. लोकांना इंग्रजीचे महत्व पटायला लागले आहे आणि गावोगाव इंग्रजी माध्यमांच्या शाळाही उघडल्या जायला लागल्या आहेत. परंतु तिथेही मराठी भाषिक शिक्षकांची वानवा जाणवत आहे आणि त्यामुळे दक्षिण भारतीय शिक्षक या नोकर्‍या पटकावत आहेत.

सध्या इंग्रजी शिक्षकांची विलक्षण चणचण भासत आहेच, पण इंग्रजीची गरज मात्र वाढत चाललेली आहे. पदवीच्या शिक्षणात जवळजवळ सेंकड इअरपर्यंत इंग्रजी सक्तीचे आहे. त्यामुळे इंग्रजीच्या प्राध्यापकांना केवळ कला शाखेतच नव्हे तर वाणिज्य, विज्ञान, संगणक शास्त्र आणि वैद्यकीय अभियांत्रिकी याही शाखांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. तेव्हा साहित्याविषयी आवड असणार्‍या विद्यार्थ्यांनी इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा पर्याय डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. सध्या ७५ ते ८० टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना विज्ञान, संगणक अशा विद्या शाखांना प्रवेश मिळणे अशक्य झाले आहे. परंतु त्यामुळे निराश होऊन हे विद्यार्थी वाणिज्य किवा अन्य कुठल्या तरी शाखेला प्रवेश घेऊन दिशाहीन वाटचाल करायला लागतात. अशा विद्यार्थ्यांनी विज्ञान नाही तर नाही इंग्रजी वाङ्मयाची निवड करीन असे म्हणून हा पर्याय निवडला पाहिजे. विज्ञान शाखेचे शिक्षण घेऊन मिळणार्‍या संधीपेक्षा इंग्रजी वाङ्मयातून मिळणारी संधी चांगली आहे, हे विसरता कामा नये.

Leave a Comment