
दिवसेंदिवस दुधाचे उत्पादन आणि वापर यात प्रचंड वाढ होत आहे आणि केवळ शेतकर्यांनी करावयाचा व्यवसाय असे त्याचे मर्यादित स्वरूप राहिलेले नाही. दुधाचे उत्पादन, प्रक्रिया, वितरण आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचे मार्केटिंग या गोष्टी करण्यासाठी शास्त्रीय प्रयत्न करण्याची गरज वाटायला लागली आहे. म्हणूनच या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज तीव्रतेने जाणवायला लागली आहे. अमेरिका, न्यूझीलंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशात तर दुग्ध व्यवसाय करणारे बडे उद्योगपती हजारो प्रशिक्षित तरुणांच्या शोधात आहेत. त्यामुळे डेअरी टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना विशेषतः पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे केवळ दुधाचेच उत्पादन नव्हे तर आइस्क्रीम, चॉकलेट यांच्या उत्पादनाचा समावेशही डेअरी टेक्नॉलॉजीमध्येच केला जायला लागला आहे. कॅडबरी, नेस्ले, ग्लॅक्सो, अमूल, वेरका अशा कंपन्या आईस्क्रिम आणि चॉकलेटचे उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणावर करायला लागल्यामुळे त्यांना उत्पादन, वितरण आणि क्वॉलिटी कंट्रोल इत्यादी कामांमध्ये अशा पदवीधरांची गरज वाटायला लागली आहे.