महाबळेश्वर

mahabaleshwar

महाराष्ट्राचा भौगोलिक  परिसर म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले दैवी वरदान!  उत्तरेकडून दक्षिणेकडे जावे तसे संपूर्ण लांबी व्यापून असलेले तीव्र चढणीचे पश्चिम घाट दृष्टीस पडतात. घाटातील पायतळीच्या  टेकड्या कधी अरबी समुद्राला हळूच स्पर्श करतात, तर कधी त्याच्यापासून ४०-५० किमी दूर पळतात. जणू काही त्यांनी अरबी समुद्राशी निरंतन लपाछपीचा खेळच मांडला आहे! याच पर्वतांमध्ये कमीअधिक उंचीवर महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे अलवारपणे उभी आहेत.

रमणीय निसर्गसौंदर्यात थोडासाही व्यत्यय आणण्याची त्यांची इच्छा नसावीशी वाटते. या ठिकाणी शहरी जीवनासाठी स्वच्छ, शांत आणि संपूर्ण ताजा टवटवीत पर्याय लाभतो. महाराष्ट्राची वाणिज्य राजधानी मुंबई म्हणजे महाराष्ट्रासारख्या पहाडी प्रदेशाचे परिपूर्ण प्रवेशद्वार! येथून देशात कोठेही पोहोचण्यासाठी सडक मार्ग, रेल्वेमार्ग व हवाई मार्ग उपलब्ध आहेत.

महाबळेश्वर

आकाशाशी स्पर्धा करणारी पर्वतशिखरे, श्वास रोखायला लावणाऱ्या दऱ्या, भरगच्च वृक्षसंपदा, ताजी-चुरचुरीत पहाडी हवा हे नक्कीच महाबळेश्वर! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिलस्टेशन. ब्रिटीश राजवटीत उन्हाळ्यातील तीव्र झळांपासून सुटका मिळविण्यासाठी हे अधिकारी इतक्या मोठ्या संख्येने येथे भेटी देत की, महाबळेश्वर जणू त्यांची ग्रीष्मकालीन राजधानीच वाटावी!

महाबळेश्वर या संस्कृत शब्दाचा अर्थ महान सामर्थ्यवान ईश्वर. खरोखरच, हे ठिकाण दिव्य असून त्याला दैवी देणगी मिळाली आहे. येथे पर्यटकांना जुन्या काळातील मोहकता, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिकता यांचा अनोखा संगम पहावयास मिळतो. महाबळेश्वर आणि आजूबाजुच्या परिसरात पहाण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे इतके काही आहे की त्यासाठी एक-दोन दिवस अपुरेच वाटतात. त्यामुळे येथे निवांत सवड काढूनच यावे.

मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर सर जॉन मालकम याच्या मृत्युनंतर येथील बाजारपेठेला मालकम पेठ म्हणूनच ओळखू लागले. महाबळेश्वर शहराच्या मध्यभागी असलेल्या या पेठेत हॉटेल्स, दुकाने, रेस्टौऱ्नटस, बंगले, शासकीय कार्यालये आणि या सगळ्यांच्या बरोबरीने जल्लोष करणारा जनसमुदाय असे सगळे काही पहावयास मिळते.

महाबळेश्वरमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे असून सुखद बाब म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगले रस्तेही उपलब्ध आहेत. त्यामुळे कारने, जीपने किंवा चक्क घोड्यावर स्वार होऊनही आपण तेथे जाऊ शकतो. येथील अनेक स्मारके आपल्याला थेट ब्रिटीशकाळात घेऊन जातात. गव्हर्नर मालकमचे निवासस्थान असलेले माउंट मालकम, १९४५ मध्ये महात्मा गांधीजींनी वास्तव्य केले ते मोराजी कासल, महाबळेश्वर क्लब गतवैभवाची आठवण करून देतात.

गावातुन फेरफटका मारताना लोभसवाणे वेण्णा लेक दृष्टीस पडते. या जलाशयावर बोटिंग, मासेमारी किंवा घोडेस्वारीही करता येते. याशिवाय करमणुकीसाठी वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचे व खाद्यपदार्थांचे ठेलेही आहेत. वेण्णा लेकवरून पुढे जाणारा रस्ता आपल्याला जवळच्याच पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जातो. तेथे नेत्रसुखद स्ट्रोबेरीचे विस्तीर्ण मळेही आहेत.

महाबळेश्वर मधील प्रेक्षणीय स्थळे पाहताना या अदभुतरम्य डोंगरपट्टयात असणारी अद्वितीय भूप्रदेशाची गुणवैशिष्ट्ये नजरेसमोर उभी राहतात. बाबींग्टन पॉईंटला जाताना वाटेत धोम धरण लागते. येथे थोडा वेळ थांबून आजूबाजूचे रमणीय सौंदर्य नजरेत साठवण्यास काहीच हरकत नाही. जुन्या महाबळेश्वरमध्ये जाऊन विख्यात पंचगंगा मंदीराला भेट देता येते. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री या पाच पवित्र नद्यांचा उगम या मंदीरात एका दृष्टीक्षेपात दिसतो. येथील महाबळेश्वर मंदीरात स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेता येते.

वर्षभरात कधीही जा, महाबळेश्वरचा निसर्ग आपल्याला कधीच निराश करणार नाही. पावसाळ्यात तर सरीआडून  याचे सौंदर्य अधिकच खुलून येते. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे जाणाऱ्यास स्ट्रोबेरी, रास्पबेरी, त्यांचे जॅम, क्रश, मध व चिक्की यांची विशेष मेजवानी लाभते. स्थानिक कारागिरांनी बनविलेली चामड्याची पादत्राणेही मनमोहक आहेत.

महाबळेश्वरपासून पुणे विमानतळ १२० किमी अंतरावर आहे. वाठार हे सगळ्यात जवळचे रेल्वेस्थानक असले तरी पुणे स्थानक सोयीचे पडते. सडकमार्गाने महाडमार्गे मुंबई-महाबळेश्वर अंतर २४७ किमी आहे. पुणे व मुंबई येथून राज्य परिवहनच्या बसेसची उत्तम सोय आहे.

महाबळेश्वरमधील प्रेक्षणीय स्थळे :

  •  माउंट मालकम : इ.स. १८२९ मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले. त्या काळी राजकीय हालचालींचे हे मुख्य केंद्र होते.
  •  होली क्रॉस चर्च : हे प्राचीन कैथोलिक चर्च रोमन शैलीत बांधले आहे. इतका काळ लोटला तरीही त्यांच्या स्टेनग्लासच्या भव्य तावदानांच्या सौंदर्यात तसुभरही कमतरता झालेली दिसत नाही.
  •  महाबळेश्वर क्लब : फुरसतीचा वेळ सुखदायक, आरामदायक व्हावा, ताणतणावापासुन मुक्तता व्हावी या हेतूने १८८१ साली या क्लबची स्थापना झाली. करमणुकीच्या सुविधांबरोबरच येथे सुसज्ज  बैडमिंटन हौल व लहान गोल्फचे ग्राउंडही आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी शुल्क आकारले जाते. आरोग्याविषयी जागरूकता बाळगणाऱ्यांसाठी क्लबच्या आवारात जॉगिंग ट्रेक बनवून त्याच्या भोवतीने गुलाब पुष्पांचा ताटवा फुलवलेला दिसतो. येथून सहज नजर खाली वळवल्यास विलोभनीय वेण्णा लेकवरून नजर हटता हटत नाही. दरवर्षी क्लबच्या सभासदांकडून व पर्यटकांकडून येथे नाताळचा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.
  •  प्रतापगड : महाबळेश्वरपासुन सुमारे २४ किमी अंतरावर मराठ्यांचा मानबिंदू असलेला प्रतापगड दृष्टीस पडतो. १६५६ साली बांधलेल्या या किल्ल्यात अनेक तलाव, कोठ्या आणि लांबलचक अंधारे पादचारी मार्ग आहेत. यापैकी काही चकवा देणारे मार्ग आपल्याला चक्क शंभर मीटर खोल खाईकडे घेऊन जातात, तेव्हा जरा जपुन! विजापुरचा पराक्रमी सरदार येथेच शिवरायांच्या हातून मारला गेला.

महाबळेश्वरमधील अनेक घाटमाथे अगदी सपाट आहेत. या घाटमाथ्यावरून खाली पाहता घनदाट जंगले आणि हिरव्यागार दऱ्या पाहून भोवंडायला होते. लौडविक पॉईंट या समुद्रसपाटीपासुन १२४० मीटर उंचीवरील ठिकाणी जनरल लौडविकचे स्मारक बांधले आहे. अर्थर सीट पॉईंटवरून जॉर वैलीचे नेत्रदीपक दृश्य नजरेस पडते. येथून एखाद्या किलोमीटरवर टायगर्स स्प्रिंग हा पॉईंट दिसतो. इथून आणखी पुढे जाण्याचे धाडस केल्यास खिडकी (विंडो) याच नावाचा पॉईंट आहे. या खिडकीतुन मनाला भुरळ पडणारा विहंगम निसर्ग साद घालतो.

विल्सन पॉईंट, कार्नेक पॉईंट, हेलन पॉईंट, एल्फीन्स्टन पॉईंट, बाबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, केट पॉईंट अशा अनेक उंचावरील ठिकाणांपासून खाली दिसणारी निसर्गदृश्ये नजरेत साठवता येतात. चिनमन फौल, धोबी फौल, लिंगमळा फौल्स अशा अनेक जलप्रपातांनाही अवश्य भेट दिलीच पाहिजे. दख्खनच्या पठारावरून वाहणारा पाच नद्यांचा संगम हाही पर्यटकांचा आकर्षणबिंदू ठरला आहे. येथे असणाऱ्या अनेक प्राचीन मंदीरांमध्ये उत्सवकाळात मोठी धुम चालते.

महाबळेश्वरपासुन सुमारे १९ किमी अंतरावर पाचगणी हे हिलस्टेशन आहे. (पंच-पाच, गणी-टेकड्या) पाच टेकड्यांच्या कुशीतील हे हिलस्टेशन पर्यटकांना आपल्याकडे अक्षरशः खेचून घेते. पाचगणीतील निवासी शाळा आणि स्ट्रोबेरी व रास्पबेरीचे मळे विशेष प्रसिद्ध आहेत. पाचगणीला भेट दिल्याखेरीज महाबळेश्वरवारी सुफल संपूर्ण झाली असे म्हणताच येणार नाही.

Leave a Comment