भंडारदरा

bhandadara

महाराष्ट्राचा भौगोलिक  परिसर म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले दैवी वरदान!  उत्तरेकडून दक्षिणेकडे जावे तसे संपूर्ण लांबी व्यापून असलेले तीव्र चढणीचे पश्चिम घाट दृष्टीस पडतात. घाटातील पायतळीच्या  टेकड्या कधी अरबी समुद्राला हळूच स्पर्श करतात, तर कधी त्याच्यापासून ४०-५० किमी दूर पळतात. जणू काही त्यांनी अरबी समुद्राशी निरंतन लपाछपीचा खेळच मांडला आहे! याच पर्वतांमध्ये कमीअधिक उंचीवर महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे अलवारपणे उभी आहेत. रमणीय निसर्गसौंदर्यात थोडासाही व्यत्यय आणण्याची त्यांची इच्छा नसावीशी वाटते. या ठिकाणी शहरी जीवनासाठी स्वच्छ, शांत आणि संपूर्ण ताजा टवटवीत पर्याय लाभतो. महाराष्ट्राची वाणिज्य राजधानी मुंबई म्हणजे महाराष्ट्रासारख्या पहाडी प्रदेशाचे परिपूर्ण प्रवेशद्वार! येथून देशात कोठेही पोहोचण्यासाठी सडक मार्ग, रेल्वेमार्ग व हवाई मार्ग उपलब्ध आहेत.

भंडारदरा

सह्याद्रीच्या रम्य डोंगररांगांमध्ये वसलेल्या भंडारदऱ्यात आपला फुरसतीचा वेळ सत्कारणी लावण्याचे सामर्थ्य एकवटले आहे. ऊंच शिखरे, रोरावत कोसळणारे धबधबे आणि हिरवीगार वनसंपदा येथे वर्षभर ठाण मांडुन असते – आपल्यासारख्या पर्यटकांना आकर्षून घेत!
भंडारदऱ्याला जाण्यासाठी ईगतपुरीत यावे लागते. मुंबईहून सडकमार्गाने यायचे झाल्यास ईगतपुरीपासुन थोडेसे पुढे येऊन, उजव्या वळणाने घोटी या छोट्याश्या गावात यायचे. या गावातून विशाल पहाड छेदीत पुढे सरकणारा अरुंद रस्ता अदभुत निसर्गाकडे घेऊन जातो. या तासाभराच्या प्रवासात निसर्गरम्य दृष्यांची अक्षरशः लयलूट होते. या सगळ्या परिसरात निळ्याशार आभाळाच्या पार्श्वभूमीवर चमचमत्या हिरव्यागार शेतांचे आणि खळाळत्या जलप्रवाहांचे  जणू काही जाळेच विणले आहे! पावसाळ्यात येथे आल्यास, खाली उतरलेल्या ढगांशी अगदी हस्तांदोलनही करता येते.
अदभुतरम्य विल्सन डमपासुन आश्चर्यकारक आर्थर लेकपर्यंत अनेक आकर्षणस्थळे भंडारदऱ्याने आपल्या कवेत घेतली आहेत. अगस्ती ऋषींनी येथे वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करून घेतले. या संपूर्ण कालावधीत ते निराहारी होते. देवाने संतुष्ट होऊन गंगेचा एक प्रवाह त्यांना भेटीदाखल दिला. तीच प्रवरा नदी! अशा रीतीने भंडारदऱ्याला पौराणिक संदर्भही लाभला आहे. येथील प्रेक्षणीय स्थळे निसर्गप्रेमींना खुणावणारी आहेत :

  •       विल्सन डेम : प्रवरा नदीवर १५० मीटर उंचीचे हे धरण १९१० साली बांधुन पुर्ण झाले. तत्कालीन अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष पटविणारे भारतातील हे मातीचे सगळ्यात मोठे धरण! धरणाच्या पायथ्याशी उत्तुंग वृक्षांची घनदाट वनराई आणि त्यातुन धावणारे जलप्रवाह पहावयास मिळतात. या झाडांच्या फांद्यांवर अनेक निरुपद्रवी वटवाघळांचे कायमचे वास्तव्य आहे. पाऊसकाळात धरण तुडुंब भरल्यावर दरवाजे उघडून पाण्याला वाट करून दिली जाते. हे पाणी, अनेकांना जीवन देत मार्गक्रमणा करू लागते. अशा वेळी बगीचाच्या कुंपणाशी  उभे राहून जलतुषार अंगावर घेता येतातच, शिवाय अम्ब्रेला फौल्ससारख्या देखण्या धबधब्याचे रूपही नजरेत साठवता येते.
  •       अर्थर लेक : भंडारदऱ्याच्या गर्द हिरव्या वनराईत निळ्याशार आकाशाचे प्रतिबिंब वागवीत आरस्पानी अर्थर लेक दिमाखात चमचमताना दिसते. प्रवरा नदीतुन त्याला पाणीपुरवठा होतो.
  •       कळसुबाई शिखर : महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगातील  हे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासुन १,६४६ मीटर ऊंचीवरून गिरीभ्रमण करणाऱ्यांना नेहेमीच भुरळ घालते. मराठ्यांच्या कालखंडात या शिखरावरून शत्रुपक्षाच्या हालचालींवर नजर ठेवुन परिसराची टेहेळणी केली जाई. या शिखरावर एक प्राचीन मंदीर असुन त्याच्या मागच्या आवारात तितकीच प्राचीन विहीरही आहे. या विहिरीतील पाण्याची पातळी आजतागायत काठापासुन  तीन फुटांपेक्षा खाली गेली नाही, असे म्हणतात. 
  •       अगस्ती ऋषी आश्रम : या अतिप्राचीन आश्रमाचा उल्लेख रामायणातुनही आढळतो. राम-लक्ष्मण अगस्ती ऋषींचे आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमात आले होते, त्यावेळी ऋषींनी रामाला दैवी बाण भेटीदाखल दिला. हाच बाण पुढे रावणाचा वध करण्याकामी उपयोगी आला अशी एक पुराणकथा प्रसिध्द आहे. हा आश्रम प्रवरा नदीच्या तीरावर वसला आहे.
  •       रतनगड किल्ला : हा प्राचीन गड शिवरायांच्या खास मर्जीतील होता. याची संरक्षक भिंत अद्यापी बरीच सुस्थितीत आहे. अनेक गिरीप्रेमी या ठिकाणी आवर्जुन भेट देतात. इथुन खाली दिसणारी हिरवाई नजरेवर गारुड करून टाकते!
  •       अमृतेश्वर : अमृतेश्वर मंदिराचे बांधकाम ११०० साली पूर्ण झाले. हेमाडपंथी शैलीतील हे मंदीर प्राचीन इतिहासाची आठवण करून देते.

अहमदनगर जिल्ह्यातील हे हिलस्टेशन मुंबईपासुन १८५ किमी अंतरावर आहे. येथील हिवाळे अतिशय थंड, तर उन्हाळे अतिशय उष्ण असतात. त्यामुळे ऋतूमानानुसार कपड्यांची निवड करावी हे उत्तम! इगतपुरी हे मध्य रेल्वेचे स्थानक येथुन ४५ किमी अंतरावर आहे. पुणे भंडारदरा अंतर आहे १९१ किमी. नाशिक, शिर्डी, त्र्यंबकेश्वर ही धार्मिक स्थळेही भंडारदऱ्याच्या आसपासच्या प्रदेशात असल्याने भंडारदऱ्याच्या सहलीत येथील देवदर्शनाचा लाभ उठविता येतो.
नाशिक हे पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक चेहेरामोहोरा लाभलेले शहर भंडारदऱ्यापासुन सुमारे ७० किमीवर आहे. हिंदूंच्या या पवित्र स्थळी गोदावरी नदीकाठी अनेक मंदीरे व घाट पाहता येतात. दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. त्यासाठी देशविदेशातील भाविक या ठिकाणी भेट देतात. औद्योगिक शहर अशी देखील या शहराची ख्याती आहे. 
नाशिकपासुन सुमारे ९० किमीवर शिर्डी हे देवस्थान आहे. साईबाबा या संतश्रेष्ठाचे या ठिकाणी वास्तव्य होते. या स्थानचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास सगळ्या जातीधर्माचे लोक तितक्याच श्रद्धेने संत साईबाबांच्या चरणी लीन होतात.   
नाशिकच्या पश्चिमेस ३० किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर असुन येथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने शिवभक्तांमध्ये  ते फारच लोकप्रिय आहे. येथील दर्शनाने मोक्षप्राप्ती होते असा या शिवभक्तांचा विश्वास आहे.

 

Leave a Comment