नर्सिंग व्यवसायाला भरपूर संधी

भारतामध्येच नव्हे तर सार्‍या जगातच वैद्यकीय सेवेतील कर्मचार्‍यांची प्रचंड चणचण जाणवत आहे. मात्र या क्षेत्राकडे भारतातल्या तरुण-तरुणींचे म्हणावे तसे लक्ष नाही. त्यामुळे उत्तम पगाराची आणि प्रगतीची संधी असताना सुद्धा परिचारिका आणि परिचारक यांच्या हजारो जागा रिकाम्या आहेत. या दोन्ही व्यवसायाशी संबंधित शिक्षण संस्था भारतामध्ये भरपूर आहेत. परंतु या संस्थांमधून शिकून बाहेर पडणार्‍या चांगल्या परिचारिका भारतात रहातच नाहीत. भारतातले शिक्षण दर्जेदार आहे, परंतु हे शिक्षण घेऊन तयार होणार्‍या चांगल्या परिचारिकांपैकी ६५ टक्के परिचारिका परदेशात जातात आणि ३५ टक्केच परिचारिका भारतात राहतात. त्यातल्या त्यात हुशार आणि निष्णात परिचारिका परदेशी जातात आणि सामान्य दर्जाच्या ३५ टक्के परिचारिका भारतात राहतात. म्हणून भारतातल्या चांगल्या चांगल्या रुग्णालयांमध्ये सुद्धा चांगल्या दर्जाच्या परिचारिका उपलब्ध नसतात. परिचारिकांना पगार छान दिला जात असतो.

केंद्र सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयात काम करणार्‍या ज्येष्ठ परिचारिकांना सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून दरमहा ३२ हजार रुपये पगार झालेला आहे. हा पगार पहिल्या वर्गाच्या अधिकार्‍याच्या बरोबरीचा आहे. काही खाजगी रुग्णालयात तर परिचारिकांना चांगलाच मान दिला जात असतो. त्यांचा नोकरीला लागत असतानाचा पगार कदाचित कमी असेल, परंतु पुढे पुढे तो वाढत जातो. काही वेळेला शासकीय सेवेतल्या परिचारिकां पेक्षा  खाजगी रुग्णालयातल्या परिचारिका चांगला पगार मिळवितात. अशा काही परिचारिका दरमहा ६० हजार रुपयांपर्यंत पगार घेत आहेत. तेव्हा तरुण मुलींनी आवर्जून या क्षेत्राकडे वळले पाहिजे. मात्र अशी प्रगती करण्यासाठी एक अट विसरता कामा नये. परिचारिकेचे हृदय हे आईचे असावे लागते. एखादी आई आपल्या बाळाची काळजी घेते तशी परिचारिकेने आपल्या रुग्णांची काळजी घेतली पाहिजे. मग आपोआप प्रगती होते.

Leave a Comment