देशभक्तीचा सुगंध अजून दरवळतो आहे

bhuikotfort

अहमदनगर शहराला माझी तशी पहिलीच भेट. राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला हा जिल्हा कसा असेल याचा विचार मनात सुरु होता. वेळ कमी असल्याने मी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्यायचे ठरवले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका कार्यालयाला भेट दिल्यानंतर मी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दिशेने निघालो. हा किल्ला कसा असेल, त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, किल्ल्याची अवस्था आता कशी असेल असे असंख्य प्रश्न मनात येत होते.

किल्ल्याजवळ पोहचताच किल्याजवळील विकास कामे पाहून आनंद झाला. या किल्ल्याचे रुपांतर राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्रात करण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांनी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती मिळाली. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहासातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. स्वातंत्र्यलढयातील अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनातील पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडित हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉ. सय्यद महसूद, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, बॅ असफ अली, डॉ. पी. सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. स्थानबध्दतेच्या या काळात पंडित नेहरुंनी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्याच हस्ताक्षरातील पत्रे येथे जतन करुन ठेवली आहेत. ती वाचतांना नेहरुजींचे सुंदर हस्ताक्षर, त्यांचे विचार, त्याचे हिंदी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतील प्रभुत्व पाहून अभिमान वाटतो.

चले जाव आंदोलनातील या सर्व नेत्यांना ज्या खोल्यांमध्ये स्थानबध्द करुन ठेवले होते त्या खोल्यांमध्ये गेल्यानंतर या नेत्यांची माहिती छायाचित्रांसह पाहिल्यावर, वाचल्यावर त्यांच्या उत्कट देशप्रेमाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या किल्ल्यातील स्थानबध्दतेच्या काळात अवघ्या ५ `महिन्यात` `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता.

किल्ल्यात पंडित नेहरुंना स्थानबध्द केलेल्या खोलीत एक कॉफीटेबल बुक ठेवले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यलढयातील अनेक प्रसंगांची तपशिलवार माहिती तसेच दूर्मिळ छायाचित्रे आहेत. या कॉफीटेबल बुकच्या मुखपृष्ठावर `Life of Nehru Fragrance that still remains `( नेहरुंचा जीवनपट- सुगंध अजून दरवळतो आहे) असे लिहिले आहे. हे वाचतांना या खोलीत स्वातंत्र्यलढयातील घटनांबरोबरच देशभक्तीचा सुगंध अजूनही दरवळत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला एकमेव किल्ला आहे. तेव्हा या भुईकोट किल्ल्याला आपण सर्वानी जरुर भेट दिली पाहिजे..

  • देवेंद्र पाटील
  • सौजन्य महान्यूज

    Leave a Comment