चला गौताळा अभयारण्यात

gautala

बर्‍याच दिवसांपासून कुठेतरी फिरायला जायचं होतं. घरातली मंडळीही म्हणत होते, बरेच दिवस कुठे जाणं झालेलं नाही. या सेकंड- फ़ोर्थला जाऊ या ! असं मी सर्वांना कबूल केलं. मित्राला फोन केला. त्याला विचारलं तर तोही सहकुटुंब यायला तयार झाला. एक कॉलिस गाडी बुक केली. ठिकाण ठरलं…गौताळा अभयारण्य!

हे अभयारण्य मराठवाडयातील सर्वात मोठे अभयारण्य होय. औरंगाबाद शहरापासून ७५ कि.मी.अंतरावर असलेलं. जवळचं शहर कन्नड, हे ५ कि.मी.अंतरावर तर चाळीसगाव हे २० कि.मी.अंतरावर. औरंगाबाद आणि धुळे यांना जोडणारा राज्य महामार्ग क्र.२११ या अभयारण्यातूनच जातो.

दिवसेंदिवस निसर्गपर्यटनाची आवड सर्वसामान्यांत वाढत आहे. औरंगाबाद हे वेरुळ अजिंठा या ऐतिहासिक लेण्यांमुळे जगाच्या नकाशावर आलं आहे. जगभरातून पर्यटक वेरुळ अजिंठय़ाच्या लेण्या, प्रसिध्द बिबीका मकबरा, दौलताबादचा ऐतिहासिक किल्ला, सोनेरी महल या ऐतिहासिक स्थळांबरोबर शुलिभंजन, म्हैसमाळ या निसर्गरम्य स्थळांना भेटी देण्यासाठी अनेक देश-विदेशातील पर्यटक नेहमी येत असतात. या निसर्गरम्य स्थळांबरोबरचं ते गौताळा अभयारण्य व तेथून पुढे सह्याद्री पर्वतराजीच्या सातमाळा पर्वत श्रेणीत पितळखोरा लेणी समूहांना भेट देण्यास विसरत नाहीत.

अंताक्षरी खेळत आमचा प्रवास सुरु होता. गाडीत गाणी रंगात येत होती तर बाहेर गौताळा अभयारण्य परिसर निसर्गाच्या विविध रंगानी रंगून गेला होता. हा सर्व परिसर पर्यटकांना, निसर्गप्रेमींना मोहून टाकत होता. प्रत्येक निसर्गप्रेमींनी या स्थळास भेट द्यावी, निसर्गाचा आनंद लुटावा असचं दृश्य अभयारण्य परिसरात होतं.

अभयारण्यात प्रवेश करतानाच वन विभागातर्फे पर्यटकांच्या स्वागताचा बोर्ड दृष्टीस पडला. पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी वन विभागाने अभयारण्यात कमान उभारली आहे. अभयारण्यात प्रवेश करताच घनदाट वृक्षराजी, वर्षानुवर्षापासून जोपासलेली सागवान व इतर मोठमोठी वृक्षे, त्यांची महामार्गावर पडणारी दाट सावली, थंडगार हवा, रस्त्यात ठिकठिकाणी दिसणारे पाण्याचे साठे, खळखळणारे प्रवाह, डोंगरावरुन येणारे लहान मोठे धबधबे, विविध रानफुले, वेली, विविध पक्षी व वन्यजीव यांच्यामुळे गौताळा अभयारण्य परिसराबद्दल पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे.

आमची भटकंती सुरुच होती. शालेय अभ्यासक्रमात निसर्ग पर्यटनाचा समावेश असल्यामुळे सहलीच्या निमित्ताने शालेय मुलंमुलीसुद्धा मोठय़ा संख्येने या अभयारण्यात निसर्ग सहलीचा आनंद घेताना दिसत होते.

फिरत असताना येथील एका फॉरेस्ट गार्डशी ओळख झाली. स्मार्ट गणवेशातील या फॉरेस्ट गार्डने आम्हाला अभयारण्याबद्दल चांगलीच उपयुक्त अशी माहिती दिली. तो म्हणाला की, निसर्ग जवळून पहाता यावा, निसर्गाचा हा ठेवा कायम स्मरणात ठेवता यावा यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी निरिक्षण मनोरे, माहिती केंद्र उभारली आहेत. या परिसरात मोठय़ा प्रमाणात वनौषधींची देखील लागवड करण्यात आली आहे. या अभयारण्यात आवळा, बेल, चिंच, शेवगा, बेहडा, गुंजपत्ता, विविध रानफुले, दुर्मिळ अशा अग्निशिखा वेली, त्यावरील सुंदर पुष्पे, पहावयास मिळतात. शिवाय जवळ-पास १९ प्रकारचे सस्तन प्राणी, घोरपड, साप, सरडे, बिबटय़ा, कोल्हा, नीलगाय, सायाळ, वानर, आणि दोनशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद आहे. केदारमुंड, धवलतीर्थ, सीताखोरी या लोकप्रिय धबधब्यांमध्ये ओलेचिंब होण्यासाठी आबालवृध्द गौताळा अभयारण्य परिसरात पावसाळ्याच्या दिवसात गर्दी करतात.

आम्ही सर्वजण एका डेरेदार वृक्षाखाली थांबलो. मस्तपैकी नाश्ता केला, चहा घेतला आणि मग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या थोर गणिती आणि खगोलतज्ज्ञ भास्कराचार्यांच्या पीठास भेट देण्यासाठी पुढील मार्गक्रमण सुरु केले. मित्राच्या मुलाने सोबतच्या फॉरेस्ट गार्डला भास्कराचार्यांबद्दलची माहिती विचारली . त्याने सांगितले की, भास्कराचार्यांनी अकराव्या शतकात सिद्धांत शिरोमणी हा गणितावरील मुलभूत ग्रंथ याच वनात लिहिला. येथेच वास्तव्य करुन त्यांनी अनेक गणिती सिद्धांत मांडले.

यानंतर आम्ही पितळखोरा लेणी पहाण्यासाठी पुढे निघालो. या लेणी अजिंठा लेण्यां इतक्या सुप्रसिध्द नसल्या तरी आकर्षक मात्र नक्कीच आहेत. यातील १३ गुंफा डोंगराच्या वरच्या बाजूने इतक्या उंचावर आहेत की तिथून भोवतालच्या दर्‍याखोर्‍यांचे विलोभनीय दृश्य दिसते.

आमच्याबरोबरचा गार्ड आम्हाला उत्साहाने अधिक माहिती पुरवित होता. कुठलाही कंटाळा न करता तो सांगत होता, या अभयारण्यास भेट देण्यासाठी जुलै ते जानेवारी हा काळ अत्यंत उत्कृष्ट आहे. याठिकाणी आल्यानंतर आपल्याला आणखीही काही निसर्गरम्य ठिकाणांना भेट देता येते. येथून १०० कि.मी.अंतरावर अजिंठा जगप्रसिध्द लेण्या,४० कि.मी. अंतरावर वेरुळ लेण्या आणि ५० कि.मी.अंतरावर दौलताबादचा ऐतिहासिक किल्ला आहे. गौताळयात पाटणादेवी वन विश्रामगृह, पुराणवाडी ही वनविश्रामगृह आहेत.

तो सांगत होता आणि एव्हाना माझ्या मनात दूरदर्शनवरील आपल्या साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी या अभयारण्याचं चित्रिकरण करावं असा विचार सुरु झाला होता. हिरवीगार वृक्षराजी, जवळून दिसणारे ढग, वाहणारे छोटे-मोठे धबधबे यामुळे चित्रीकरण करण्यास मजा येईल याचा मला मनोमन खूप आनंद झाला होता. आणि त्याचं नियोजन करीत आम्ही जेवण करण्यासाठी विश्राम गृहाकडे निघालो.

 

  • सुरेश काचावार
  • Leave a Comment