खास पालकांसाठी

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि ज्या घरातले विद्यार्थी बारावीची परीक्षा पार करून व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यास सिद्ध झालेले आहेत. प्रत्येक घरांमध्ये आता बारावीनंतर काय? या चर्चेचे फड रंगायला लागलेले आहे. या चर्चेत प्रत्यक्षात उत्तीर्ण होणारा विद्यार्थी, त्यांचे पालक आणि अन्य सल्लागार यांचा सहभाग असतो. परंतु अंतिम निर्णय घेण्याच्या बाबतीत विद्यार्थ्यालाच कोणी विचारत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याची कुचंबना होते आणि पुढच्या शिक्षणात त्याला रस वाटेनासा होतो. त्याच्या मनामध्ये निराशा ठाण मांडायला लागते. हे टाळण्यासाठी …..
 
१) पालकांची इच्छा त्यांनी मुलांवर लादू नये. परंतु तसे होत नाही. पालकांना मुलाचे पुढचे शिक्षण हा आपल्या आयुष्यातला दुसरा टप्पा वाटत असतो. त्यामुळे स्वत:च्या शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना जे जे करण्यास अपयश आलेले असते ते सारे मुलांनी करावे, असा त्यांचा दबाव असतो. एखाद्या पालकाला डॉक्टर होण्याची इच्छा असते, परंतु तो कंडक्टर होतो आणि डॉक्टर होण्याची आपली अपुरी इच्छा मुलावर लादायला लागतो. मुलगा काय होणार, याच्याशी तुमच्या अपुर्‍या इच्छेचा काही संबंध नाही. त्याच्या आयुष्यातला तो पहिला आणि महत्वाचा टप्पा असतो हे लक्षात ठेवा.

२) दहावीनंतर अकरावीला प्रवेश घेतला जातो आणि पाच वर्षांमध्ये हा मुलगा पदवीधर होतो. एखादेवेळी त्याच्या भवितव्याचा निर्णय त्याच्यावरच सोपवल्यामुळे तो चुकीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतो. हा निर्णय चुकला तरी त्याच्या आयुष्याचे वाटोळे होत नसते हे लक्षात ठेवा. कारण आता पदवीचा अभ्यासक्रम आवडीचा नसला तरी पदवीनंतरही आवडीचा अभ्यासक्रम निवडण्याची संधी आहे. कित्येक डॉक्टर आय.ए.एस. व्हायला लागलेले आहेत आणि अनेक इंजिनिअर्स एम.बी.ए.च्या परीक्षा देऊन व्यवस्थापनाचा आवडीचा मार्ग चोखाळायला लागले आहेत.

३) मुलांचा कल जिकडे असेल तोच अभ्यासक्रम निवडण्यास त्याला मदत करा. चित्रकलेची आवड असणार्‍या विद्यार्थ्याला, चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण करून फार पैसे मिळत नाहीत म्हणून भलत्याच अभ्यासक्रमाकडे वळवू नका.

४) बारावीत जास्त मार्क मिळाले म्हणजे त्याने इंजिनिअरच झाले पाहिजे असे काही नाही. एखादा ९० टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी कला शाखेची आवड असल्यामुळे त्या शाखेकडे वळला किंवा त्याला वाणिज्य शाखेकडे जावे वाटले तर ते शैक्षणिक दृष्ट्या किंवा व्यवसाय निवडीच्या दृष्टीने काही तरी चुकीचे आहे असे समजण्याचे काही कारण नाही.

५) मुलांचा अभ्यासक्रम निवडण्याबरोबरच त्याचे महाविद्यालय कोणते असावे याचाही निर्णय महत्वाचा असतो. कारण त्याचेही काही परिणाम त्याच्या भवितव्यावर होत असतात. म्हणून प्रतिष्ठीत महाविद्यालय निवडण्याऐवजी सोयीचे महाविद्यालय निवडले पाहिजे.

Leave a Comment