सहस्त्रकुंडचे सौंदर्य
पावसाळ्याचे दिवस असल्याने किनवटला जातांना वाटेवरल्या हिरव्यागार वनराईचा मनमुराद आनंद लुटत होतो. निमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत होणार्या बैठकीचे होते. मात्र वाटेवरच नांदेडच्या वैभवस्थानापैकी एक असणार्या सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्य अनुभवता येणार होते. सकाळचा वृत्तसार पाठविल्यानंतर लवकरच प्रवास सुरू झाला.
भोकर तालुका सुरू होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी सागाची झाडे जणू स्वागताला सज्ज असतात. दाट झाडीतून पावसाळी वार्याचा सुखद स्पर्श काही औरच मजा देत होता. रस्त्यात खळखळत वाहणारे झरे यंदा झालेल्या चांगल्या पर्जन्याचे सुचक होते. एरवी शांत निवांत वाटणार्या या भागात जणू चैतन्य भरल्याचे जाणवत होते. रस्त्यात सुंदर रानफुल दिसले की त्याला कॅमेर्यात कैद करायचे आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू…..
सकाळच्यावेळी रस्त्यावर फारशी वाहतुक नसल्याने हिमायतनगर ओलांडून किनवट तालुक्यातील इस्लापूरला लवकर पोहचलो. याच ठिकाणावरून अवघ्या ४ किमी अंतरावर सहस्त्रकुंड धबधबा. पेनगंगा नदीवरील हा आकर्षक धबधबा पर्यटकांसाठी चांगले आकर्षण आहे. प्राचीन आख्यायिकेनुसार याठिकाणी प्रभु परशुरामाचा पदस्पर्श झाल्याचे ऐकायला मिळते…. दुरून नदीचे पात्र दृष्टिपथास पडले तशी उत्सुक ता वाढू लागली. सोबतचे कॅमेरे सज्ज करून मंदिराच्या दिशेने पुढे गेलो. समोर जे दृष्य दिसलं त्याचं ‘अद्भुत’ या एका शब्दात वर्णन करता येईल.
साधारण २० मिटर उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहून ‘नांदेडचा नायगरा’ अशी उत्स्फुर्त प्रतिक्रीया बाहेर पडली. तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून फेसाळणारे पाणी खोल कुंडात (यात अनेक कुंडांचा समावेश असल्याचे सांगितले जाते) पडतांना उडणारे बारीक तुषार दूरपर्यंत पसरतात. अंगावर तुषारांचा मऊशार थंड स्पर्श अनुभवतांना पर्यटक रोमांचित होतात. या धबधब्याच्या समोर उभे राहून छायाचित्र काढण्याचा मोह आवरला जात नाही. समोरच्या खडकाळ भागावर शांतपणे बसून एका बाजूला परिसरातील हिरवे डोंगर आणि दुसर्या बाजूला पेनगंगेच्या रूंद पात्रातून डोहात झेपावणार्या धबधब्याचे सौंदर्य अनुभवणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते.
या धबधब्यातील जलस्तंभाचा उपयोग करीत वीज निर्मितीच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत सॅडल धरण व सहस्त्रकुंड धरण तयार करण्यात येणार आहे. मुख्य धरणाच्या वरील बाजूने १०.३ किमी लांबीच्या जोड कालव्याद्वारे सॅडल धरणात पाणी आणून तेथे साठविले जाणार आहे. याठिकाणी ७० मिटर खोलीचा जलस्तंभ प्राप्त होणार असल्याने २० मेगावॅटचे जलविद्युत गृह प्रस्तावित आहे. तसेच सॅडल धरणाच्या खालच्याबाजूस निंगणूर लघु पाटबंधारे प्रकल्प असून तेथे सॅडल धरणातील पाणी पायथ्याच्या कालव्याद्वारे आणून ५ मेगावॅटचे दुसरे जलविद्युत गृह प्रस्तावित आहे. विद्युत निर्मिती बरोबर पर्यटनासाठी देखील हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.
……प्रत्येक ठिकाणाहून दिसणारे सहस्त्रकुंडचे सौंदर्य वेगळे तेवढेच मोहक होते. दोन मोठय़ा धारांच्या मधला काळाशार खडक त्या सौंदर्यात भर पाडत होता. खळखळत कोसळणारी पाण्याची धारा तेवढीच शांत होऊन डोंगराच्यामधून लुप्त होतांना पाहून पाहणार्यालाही शांततेचा अनुभव येतो. हा अनुभव मनात साठवून किनवटकडे वळलो. रस्त्यात पिवळी, जांभळी, तांबडी, लाल फुले मोकळ्या मैदानाचे सौंदर्य वाढवित होती. हरणांचे कळपही छायाचित्रकार होकर्णेना खुणवत होते. निसर्गाच्या सान्निध्यातील मनसोक्त आनंद लुटतांना मध्येच गाडीतून उतरत पायी भटकंती केली. सृष्टीने भरभरून दिलेले हे ‘हिरवे दान’ कॅमेर्यामध्ये पुर्णत: बंदिस्त करता येणार नव्हते. मात्र इंग्रजीच्या धडय़ात वाचल्याप्रमाणे ‘हृदयाची कवाडे उघडून निसर्गाकडे पाहिल्यास विश्व डोळ्यात सामावतं’. तेवढच केलं आणि आनंदी मनाने किनवटला पोहचलो.
सौजन्य महान्यूज