पूर्ण स्वदेशी बनणार भारतीय चलनी नोटा


रिझर्व्ह बँकेने भारतीय चलनी नोटा पूर्ण स्वदेशी बनविण्याचा निर्णय घेतला असून या नोटा तयार करताना स्वदेशी तंत्र, स्वदेशी शाई, स्वदेशी कागद तसेच स्वदेशी सुरक्षा मानके यांचाच वापर केला जाणार आहे. यामुळे या नोटा अधिक सुरक्षित असतील असे सांगितले जात आहे.

आज भारतीय चलनात असलेल्या नोटांसाठी वापरण्यात येणार्‍या बहुसंख्य वस्तू परदेशातून आयात केल्या जातात. कागद, शाई, सुरक्षा धागाही परदेशातून मागविला जातो. इतकेच नव्हे तर सुरक्षा मानकेही परदेशीच असतात. याच बाबींचा वापर जगभरात अनेक देश करत असतात. त्यातून कांही वेळा हा कच्चा माल पुरेशा प्रमाणात मिळाला नाही तर नोटछपाई मंदावते. नोव्हेंबर २०१६ मध्ये घोषित झालेल्या नोटबंदीमुळे लोकांना प्रयत्न करूनही पुरेशा प्रमाणात व वेळेवर नोटांचा पुरवठा होऊ शकला नाही ही बाबही रिझर्व्ह बँकेने लक्षात घेतली आहे.

येत्या तीन ते पाच वर्षात नोटांसाठीचा कागद, शाई, विशेष धागा आदि वस्तू पूर्णपणे स्वदेशातच तयार केल्या जाणार आहेत. तसेच सुरक्षा मानकेही वेगळी व अधिक सुरक्षित करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. यामुळे बनावट नोटा तयार होण्यावर आपोआपच लगाम लागेल असा अंदाज वर्तविला जात आहे. २०१६-१७ मध्ये ७,६२,०७२ नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.