इंजिनिअर होताना

सध्या वैद्यकीय शाखेपेक्षा अभियांत्रिकी शाखेकडे मुलांचा जास्त कल आहे. महाराष्ट्रात यावर्षी नवी ४० अभियांत्रिकी महाविद्यालये उघडली गेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली अभियांत्रिकी महाविद्यालयांची सं‘या ३०९ वरून ३४९ झाली आहे. १९८० पर्यंत महाराष्ट्रात जेमतेम १० अभियांत्रिकी महाविद्यालये होती. ही संख्या वाढून तब्बल साडेतीनशे पर्यंत जाणे हे अक्षरश: आश्‍चर्यजनक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी सव्वा लाखावर विद्यार्थी इंजिनिअर होण्याच्या महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्याशिवाय तंत्रनिकेतनात जाणारे विद्यार्थी जवळपास २ लाख आहेत. ही मोठी संख्या विचारात घेतली म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयात जाताना सुद्धा केवळ इंजिनिअर होता येते एवढ्या एका कल्पनेने भारावून जाऊन वाट्टेल त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळेल त्या अभियांत्रिकी विषयाला प्रवेश घेणे चुकीचे असल्याचे लक्षात येईल. हजारो विद्यार्थी केवळ इंजिनिअर होण्याला महत्व देतात. परंतु तसे न करता आपण कोणत्या प्रकारचे इंजिनिअर होणार आहोत याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. तो घेताना त्यांनी  खालील मुद्यांचा विचार केला पाहिजे.

१) अभियांत्रिकीच्या सगळ्या शाखा सार‘या नसतात. प्रत्येक शाखेला वेगळ्या प्रकारचा मनाचा कल आणि वेगळ्या प्रकारचे कौशल्य आवश्यक असते. तेव्हा लोकांमध्ये ज्या शाखेची चर्चा असते ती शाखा निवडण्यापेक्षा आपल्या मनाचा कल ज्या शाखेकडे असेल ती शाखा निवडावी. त्यासाठी या क्षेत्रातल्या अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा.

२) व्यक्तिमत्व – अभियांत्रिकीच्या विविध शाखांना विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वांची गरज असते. माहिती तंत्रज्ञानात काम करण्याची क्षमता आणि प्रवृत्ती असणारा अभियंता अभियांत्रिकीच्या इतर शाखांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून केवळ भावनेच्या भरात मेकॅनिकल इंजिनिअर झालेले अनेक अभियंते नंतर पश्‍चाताप होऊन या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत.

३) स्थापत्य अभियंता हा शरीर प्रकृतीने कणखर आणि दगदग सहन करणारा असावा लागतो. त्याला अर्धशिक्षित आणि अशिक्षित लोकांकडून काम करून घ्यावे लागते. असे व्यक्तिमत्व नसणारा अभियंता कितीही हुशार असला तरी या शाखेत काम करू शकत नाही.

४) माहिती तंत्रज्ञानात काम करणारे अभियंते चिकाटीने आणि विविध पाळ्यांमध्ये काम करण्यास तयार असावे लागतात. ही गरज स्थापत्य अभियंत्यासाठी नसते.

५) अभियांत्रिकीसारख्या कष्टप्रद अभ्यासक्रमाची निवड करताना महाविद्यालय कोठे आहे, निव्वळ जाण्यायेण्यातच शक्ती खर्च होणार नाही ना, याचा विचार करावा लागतो.

६) महाविद्यालयाचे व्यवस्थापन, कॉलेजचा दर्जा, उपलब्ध साधने, प्राध्यापक, निकालाची परंपरा आणि प्लेसमेंट याचाही विचार करून महाविद्यालय निवडले पाहिजे.