आंब्याच्या काही सोप्या रेसिपीज

फळाचा राजा आंबा आता बाजारात दाखल झाला आहे. आंबा न आवडणारी व्यक्ति सापडणे खरोखर कठीणच आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला क्षीणता येत असते.पण निसर्गानेच या सीझनमध्ये अनेक प्रकारची फळे उपलब्ध करून दिलेली असतात. तहान भागविणारी, तनामनाला शांती आणि थंडावा देणारी ही बहुतेक फळे अ जीवनसत्त्वाने युक्त असतात.

असे सांगतात की आंब्याच्या हंगामात भरपूर आंबे खाल्ले की वर्षभरासाठी शरीराला असलेली अ जीवनसत्त्वाची गरज भागते. सर्वच फळे जीवनसत्त्वांची जणू खाण असतात शिवाय अँटी ऑक्सिडंडने युक्त असतात. त्यामुळे ज्या ज्या सीझनमध्ये जी जी फळे येतात ती अवश्य खाल्ली पाहिजेत. म्हणजे कृत्रिम व्हिटॅमिन्स औषधरूपाने घेण्याची गरजच पडणार नाही.

आपण आंब्यापासून बनविल्या जाणार्‍या कांही सोप्या पण खास रेसिपींची माहिती करून घेऊया.
 आंब्याची सगळ्यात सोपी रेसिपी कुठली म्हणून विचाराल तर त्याचे उत्तर आहे, चांगला पिकलेला हापूस अथवा पायरीचा आंबा घ्यावा, पाण्याने स्वच्छ धुवावा आणि सुरीने कापून लगेच खावा. कधीमधी आंबा पिळून मऊ करावा आणि तोंडाने चोखून खावा. कधीतरी चांगल्या पिकलेल्या हापूसची साल सोलून (ती हातानेही सोलता येते बरं का! ) साल काढलेल्या या आंब्याचे चांगले मोठे मोठे लचके तोडून तोंडभर त्याची चव अनुभवावी. विशेष म्हणजे लहान थोरांना सर्वांना या पद्धतीने आंबे खाल्यास समाधान मिळतेच पण आंबा खाण्याचा खराखुरा आनंदही अनुभवता येतो असे माझे निरीक्षण आहे.
 मग, तुम्हीही हा अनुभव घ्या आणि कसा वाटला आम्हालाही कळवा, कळवाल ना?

आता मात्र खरोखरीच्या आंब्याच्या कांही रेसिपीज पाहूया-
 
आंबायुक्त शेवयांची खीर

साहित्य-शेवया १ वाटी, साखर १ ते दीड वाटी. दूध १ लिटर, हापूसचा मोठी वाटी भरून रस, तीन ते चार चमचे साजूक तूप
कृती- ही खीर करताना शक्यतो हातशेवई घ्यावी. अन्यथा कुठल्याही शेवया चालतील. कुसकरलेल्या शेवयां थोड्या चुरडून तुपात चांगल्या परताव्यात. लालसर रंगावर आल्या की त्यात दूध घालावे. दूध तापविले असल्यास सायीसकट घालावे अन्यथा कच्चे दूध घातले तरी चालेल. उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर त्यात साखर घालावी. सुरवातीला थोडे सतत ढवळावे. साखर विरघळून पुन्हा उकळी आली की गॅस बारीक करून मंद आचेवर खीर दाट होईपर्यंत शिजवावी. (साखर घातल्यावर सतत ढवळणे आवश्यक असते अन्यथा साखर करपून त्याचा वास खिरीला लागण्याची दाट शक्यता असते.)
खीर गार झाल्यानंतर वाटीभर हापूस आंब्याचा रस मिक्सरवर फिरवून त्यातील गुठळ्या मोडून घ्याव्या व हा रस खिरीत घालावा आणि ढवळावे. खीर पुन्हा गरम करू नये. ही तयार खीर फ्रिजमध्ये ठेवून चांगली गार करावी आणि जेवणात, जेवणानंतर खायला द्यावी.
मुख्य म्हणजे ही खीर आधीच करून ठेवता येत असल्याने जेवणातील पक्वानाचा प्रश्न सुटू शकतो आणि वेळही वाचतो. आंब्याचाच सुवास असल्याने वेलदोडा, जायफळ घालायची गरज राहात नाही.

आंब्याच्या रसातला शिरा

साहित्य- १ वाटी बारीक अथवा मध्यम रवा, साजूक तूप अर्धी वाटी, साखर सव्वा वाटी, उकळते पाणी दीड वाटी, गोड आंब्याचा रस १ वाटी.
कृती- प्रथम कढईत साजूक तूप घालून त्यात रवा घालावा आणि मंद आचेवर तांबूस लाल भाजून घ्यावा. एकीकडे पाणी उकळत ठेवावे. रवा भाजून झाल्यावर त्यात उकळते पाणी ओतून चांगले ढवळावे आणि एक वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात साखर घालून पुन्हा चांगले ढवळावे आणि पुन्हा एक वाफ येऊ द्यावी. साखर विरघळली की त्यात आंब्याचा रस घालून ढवळावे आणि पुन्हा वाफ येऊ द्यावी. मिश्रण आळून थोडे घट्ट झाले की शिरा तयार झाला. या शिर्‍यावर पुन्हा थोडे साजूक तूप घालावे.
  या शिर्‍यात बेदाणे आणि वेलदोडा घालयचा असेल तर रस घालण्यापूर्वीत घालावा. मात्र आंब्याचा स्वाद चांगला असेल तर त्याची गरज पडत नाही. आवडत असल्यास काजू अथवा भिजविलेल्या बदामाची साले काढून त्याचे तुकडे करून ते घालता येतील. त्यामुळे शिरा आणखी पौष्टिक होईल आणि त्याला रिच लूकही येईल. आंब्याचे लोणचे अथवा खारातर्‍या मिरचीबरोबर शिरा द्यावा. शक्य असल्यास गरमागरम शिरा लोणच्यासोबत केळीच्या अथवा कर्दळीच्या पानावरच द्यावा. वेगळीच चव येते.
 रवा जाड असल्यास अथवा मध्यम जाड असल्यास पाणी दोन वाट्या घ्यावे.