पावसाळ्यामध्येही सनस्क्रीनचा वापर गरजेचा


न्यूयॉर्क येथे असलेल्या स्किन कॅन्सर फाऊंडेशन नुसार पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणामधील जवळ जवळ ऐंशी टक्के अल्ट्रा व्हायोलेट रेज ढगांच्या कवचाला भेदून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. याचाच अर्थ असा की आपण पावसाळ्यामध्ये बाहेर फिरण्याचा आनंद घेत असू किंवा गुलाबी थंडीमध्ये भटकंतीसाठी निघालो असू, आपल्याला सनस्क्रीन ची गरज वर्षाचे बाराही महिने असते. अल्ट्रा व्हायोलेट रेज मुळे आपली त्वचा टॅन होऊ शकते, त्वचेवर सन बर्न होऊ शकतात आणि त्वचेवर अकाली वृद्धत्वाच्या खुणाही उमटू शकतात. त्यामुळे आपल्या त्वचेसाठी योग्य आणि आपण ज्या भागामध्ये राहतो तिथले हवामान लक्षात घेऊन योग्य असे एसपीएफ असलेले सन स्क्रीन निवडणे गरजेचे असते.

आता एसपीएफची मात्रा किती असावी हे कसे ओळखावे? बहुतेक लोकांची अशी समजूत असते की सनस्क्रीनमध्ये जितके जास्त एसपीएफ, तितकी उन्हापासून त्वचेची जास्त सुरक्षा. पण असे नसून, सनस्क्रीन मधील एसपीएफ ची मात्रा, ते सनस्क्रीन उन्हापासून किती वेळाकरिता त्वचेचे संरक्षण करू शकेल हे दर्शविते. त्यामुळे सनस्क्रीन निवडताना २६ पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडावे. एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन आपल्या त्वचेला उन्हापासुन साधारण दहा तासांपर्यंत संरक्षण देऊ शकते, तर एसपीएफ ५० असलेले सनस्क्रीन आल्या त्वचेला १५ तासांपर्यंत उन्हाच्या दुष्परिणामांपासून वाचवू शकते.

सर्वसाधारणपणे एसपीएफ ३० असेलेले सनस्क्रीन सर्वात उपयोगी ठरते. पण हे सनस्क्रीन दिवसातून अनेक वेळा लावले तरच उन्हापासून आपल्या त्वचेला संरक्षण मिळते. अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचेवरील सनस्क्रीनचे आवरण हळूहळू निकामी होत जात असल्याने, दर तीन तासांनी सनस्क्रीन लावल्याने फायदा होतो. हवा, म्हणजेच वारा आणि ऊन यांच्यामुळे त्वचा रुक्ष आणि कोरडी पडू शकते. अश्या वेळी अॅलो व्हेरा, शिया बटर, आणि फळांची सत्वे असलेले सनस्क्रीन वापरावे. सनस्क्रीन लावताना चेहरा, मान आणि हातांना , आणि विशेषतः शरीराचे जे अवयव कपड्याने झाकलेले नसतील तिथे सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. चेहरा, किंवा हातांच्या मागच्या बाजूची त्वचा जास्त नाजूक असल्याने त्यावर जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment