संसद ते शिवार


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्ठी यांनी भाजपाला रामराम ठोकून आता संघर्षाच्या मार्गाने शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. शेट्टी यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्‍न आहे पण या निमित्ताने त्यांच्या अस्थिर राजकारणाचेच दर्शन होत आहे. शरद पवार यांनी राजू शेट्टी यांच्या निर्णयाची पाठराखण करण्याची भूमिका घेतली आहे. पवारांचे स्वत:चेे राजकारण असेच राहिलेले आहे त्यामुळे त्यांना आता शेट्टी आवडायला लागले आहेत. मुळात राजू शेट्टी हे शरद जोशी यांचे अनुयायी. त्यांच्याचमुळे प्रेरणा मिळून शेतकरी संघटनेत आले. पुढे दोघांत मतभेद निर्माण झाल्याने राजू शेट्टी जोशींच्या संघटनेतून बाहेर पडले. हे मतभेद भाजपाविषयी संघटनेची भूमिका काय असावी यावरून निर्माण झाले होते. जोशी यांनी १९९९ साली केन्द्रातल्या भाजपा सरकारशी सलोखा केला होता. तो राजू शेट्टी यांना पसंत पडला नाही. जोशी यांच्या या सलोख्यामुळे धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याची बांग ठोकून ते शेतकरी संघटनेतून बाहेर पडले आणि त्यांनी आपली वेगळी संघटना स्थापन केली.

२०१४ साली मात्र राजू शेट्टी यांनी स्वत:च भाजपाशी युती केली. मग यावेळी भाजपात काय बदल झाला होता? मग १९९९ साली भाजपाशी युती हे पाप होते आणि त्यामुळेच राजू शेट्टी यांना संघटना मोडावी लागली होती तर आता भाजपाशी हातमिळवणी झाल्यावर त्यांनी शेतकरी संघटनेत परत यायला हवे होते. राजू शेट्टी यांची अवस्था देशातल्या दिशाहीन समाजवाद्यांसारखी झाली आहे. भाजपाशी युती करण्यावरून त्यांच्यात कायमचा संभ्रम आहे. भाजपाला शत्रू क्रमांक एक जाहीर करून धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करावे की भाजपाशी हातमिळवणी करून कॉंग्रेसला संपवावे या बाबत ते सतत संभ्रमात असतात. त्यामुळे त्यांची अवस्था काय झाली आहे हे आपण पहातच आहोत. तशीच अवस्था राजू शेट्टी यांचीही झाली असून त्यातून केल्या जाणार्‍या राजकारणातून भाजपा तर संपली नाहीच पण कथित धर्मनिरपेक्षताही टिकली नाही. स्वत: राजू शेट्टीच संपण्याची वेळ आली आहे. हा संभ्रम टाळण्यासाठी राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेचे तत्त्वज्ञान नीट समजून घ्यायला हवेच पण आंदोलनाचेे शास्त्रही नीट अवगत करायला हवे. ते केल्यानंतर वैयक्तिक हेवेदावे आणि अहंकाराचे मुद्दे बाजूला सारून त्यांची अंमलबजावणी करायला हवी पण राजू शेट्टी यांना ते जमलेले नाही. म्हणून त्यांची आता परवड व्हायला लागली आहे.

शेतकरी संघटना हा काही स्वतंत्र पक्ष बनून सत्ता हस्तगत करू शकत नाही. शरद जोशी यांनी स्वतंत्र भारत पक्ष स्थापून तसा प्रयत्न करून पाहिला पण त्यात यश आले नाही. तेव्हा शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करून घेण्याचा त्यांच्यासमोर एक मार्ग होता तो म्हणजे राजकारणात दबाव गट म्हणून काम करण्याचा. लोकशाहीत असा दबाव गटच आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात यशस्वी ठरत असतात. सत्ताधारी कोणीही असो त्यांना सत्ता टिकवण्यात रस असतो आणि लोकशाहीत अस्थिरता आली की, सरकारचे टिकणे हे चार दोन आमदारांवर आणि एक दोन टक्के मतांवर ठरायला लागते. अशा प्रसंगी दबाव गटांना आपले प्रश्‍न सोडवून घेणे सोपे जाते. हे कामही दोन पातळ्यावर करावे लागते. लहान सहान मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणे. अशा मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपल्याला सत्ता गमवावी लागेल याची जाणीव झाली की, सरकार मागण्यांपुढे मान झुकवते. तेव्हा सत्तेत राहून अशा मागण्या मान्य करूऩ घेता येतात. पाशा पटेल यांनी सध्या भाजपात राहून अशा मागण्या पदरात पाडून घेण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे.

दुसरी पातळी असते ती धोरणात्मक. सरकारवर दबाव टाकून सरकारला शेतकरी हिताची धोरणे स्वीकारायला भाग पाडण्याची ही पातळी असते. शरद जोशी यांना भाजपा सरकारने सरकारची धोरणे कशी असावीत याचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले होते. कसलाही दबाव न आणता आपली धोरणे सरकारच्या गळी उतरवण्याची ही आयती संधी जोशी यांना मिळाली होती. तिचा लाभ उठवण्यासाठी त्यांनी भाजपाशी जवळीक केली. तशीच भूमिका राजू शेट्टी यांनी घ्यायला हवी होती आणि सरकारच्या जवळ जाऊन सरकारच्या धोेरणांना आपल्या मनाप्रमाणे वळण लावण्याचे काम करायला हवे होते. केन्द्रातले नरेन्द्र मोदी आणि महाराष्ट्रातले देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार शेतकरी हिताच्या विरोधात नाही. शेतकर्‍यांच्या आयुष्यातली परवड संपावी अशी या दोघांचीही प्रामाणिक इच्छा आहे. तिचा सन्मान करून राजू शेट्टी यांनी सत्तेच्या जवळ राहण्याची भूमिका घ्यायला हवी होती. हे सारे असतानाही त्यांनी केवळ सदाभाऊ खोत यांना पाण्यात पाहून आणि आपल्या लोकसभेच्या एका जागेचा स्वार्थ साधण्याच्या हेतूने भाजपा पासून फारकत घेतली आहे. संघटनेच्या हितावर वैयक्तिक हेवेदावे वरचढ ठरले आहेत. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाला शरद जोशी यांच्या नेतृत्वाची उंची लाभत नाही ती याचमुळे होय. शेवटी संघटना यशस्वी ठरून ती शेतकर्‍यांच्या हितास सहायभूत ठरायची असेल तर चळवळ आणि तत्त्वज्ञान यांचा योग्य मेळ साधायला हवा आहे.

Leave a Comment