भारतामध्येही गरम पाण्याचे झरे पाहण्याची पर्वणी


गरम पाण्याचे झरे ही एक नैसर्गिक संकल्पना आहे. हे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे जगभरामध्ये फारच कमी ठिकाणी आढळतात. पण आपल्याला हे झरे पहावयाचे असतील, तर त्याकरिता जगभ्रमंती करण्याची गरज नाही. भारतमध्ये ही काही ठिकाणी हे झरे अस्तित्वात असल्याने ते पाहण्याची संधी आपल्याला सहज मिळू शकेल.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामध्ये असलेल्या मणीकरण या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे. मणीकरण हे ठिकाण पार्वती नदीच्या किनारी असून, शीख समाजातील लोकांचे प्रार्थानास्थान असलेला गुरुद्वारा तिथे आहे. येथील गरम पाण्याचा झरा औषधी गुणांनी युक्त असल्याचे म्हटले जाते. ह्या कुंडातील पाणी इतके गरम आहे, की यामध्ये कापडात बांधलेल्या तांदुळाच्या पुरचुंड्या सोडल्यास त्याचा भात ही शिजतो. अर्थात याला पुष्कळ वेळही लागतो कारण हे पाणी अगदी उकळते नाही. गुरुद्वारा मध्ये दर्शनाला येणारे भाविक या गरम पाण्यामध्ये पवित्र स्नानाचा अनुभव घेतात.

जोशीमठ हे स्थान ट्रेकिंग प्रेमींच्या पसंतीचे स्थान आहे. बद्रिनाथच्या वाटेवर, चामोली पासून अगदी थोड्याच अंतरावर तपोवन नावाचा गरम पाण्याचा झरा आहे. या गरम पाण्यामध्ये सल्फर ची मात्र अधिक असून त्वचारोगांचे निवारण करण्यासाठी हे पाणी गुणकारी असल्याचे सांगितले जाते.

वशिष्ठ ऋषींचे नाव प्राप्त झालेले, मनाली येथील वशिष्ठ मंदिर जवळ जवळ ४००० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. या मंदिराजवळच हडींबा मंदिरही आहे. या मंदिरांच्या जवळ गरम पाण्याचा झरा आहे. स्थानिक लोक, हा झरा अतिशय पवित्र असून त्याच्या पाण्यामध्ये स्नान केल्याने अनेक रोग बरे होत असल्याचे सांगतात. इथे भटकंती करण्यासाठी आलेले पर्यटक इथून जवळच असलेल्या छोट्याशा बाजारामध्ये लहानलहान शोभेच्या वस्तू खरेदी करताना दिसतात.

बिहार मधील राजगिर येथे ब्रह्म कुंड नावाचा गरम पाण्याचा झरा आहे. हिंदू धर्माच्या लोकांसाठी हे ठिकाण विशेष मानले जाते. ब्रह्मकुंडाच्या पाण्याने सांधेदुखी आणि स्नायूंचे दुखणे बरे होते असे म्हटले जाते. या कुंडामध्ये स्नान करणाऱ्याचा शारीरिक थकवा दूर होऊन स्वस्थता लाभते, असे येथे आवर्जून येणाऱ्या भाविकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment